Noida Lamborghini Accident: गेल्यावर्षी पुण्यात आलिशान गाडीने दोघांचा जीव घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच नोएडामध्ये एका लॅम्बोर्गिनी कारने फूटपाथवर बसलेल्या दोन मजुरांना चिरडले. कामगार गंभीर जखमी झाले. अपघातानंतर एकच गोंधळ उडाला होता. जेव्हा लोक गाडीजवळ धावत आले तेव्हा ड्रायव्हरने कोणी मेले आहे का? असा सवाल विचारला. मग तो हळूच गाडीतून बाहेर आला. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी नोएडाच्या सेक्टर ९४ मध्ये फूटपाथवर बसलेल्या दोन मजुरांना एका भरधाव लॅम्बोर्गिनी कारने धडक दिली. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, गाडी चालवणाऱ्या दीपक नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गाडी जप्त केली आहे. ही गाडी युट्यूबर मृदूल तिवारीच्या नावावर असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी मृदूलली चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
रविवारी दुपारी डिव्हायडरवर काही मजूर उभे होते. त्याचवेळी लॅम्बोर्गिनी भरधाव वेगात आली. कामगारांसमोर आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि डिव्हायडरवर चढली. दरम्यान, तिथे उभ्या असलेल्या दोन मजुरांना या कारने धडक दिली. या अपघातात एका मजुराचा पाय मोडला. त्याचवेळी आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्ही मजूर छत्तीसगडचे रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.
रविदास आणि रंभू कुमार हे दोन मजूर फूटपाथवर बसले होते. भरधाव वेगात असलेली लॅम्बोर्गिनी त्यांच्या अंगावर आली फूटपाथवर चढली आणि झाडाला धडकली. पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या दीपक कुमारला अटक केली आहे. तो अजमेरचा रहिवासी आहे. दीपकने सांगितले की, त्याने गाडी टेस्ट ड्राईव्हसाठी घेतली होती. दीपक लक्झरी कार खरेदी आणि विक्रीच्या व्यवसायात ब्रोकरचे काम करतो. अपघातावेळी तो टेस्ट ड्राईव्ह करत असताना गाडीमध्ये काही त्रुटी जाणवत होत्या. त्या तपासण्यासाठी गाडी चालवत असतानाच हा अपघात झाला.
दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये जेव्हा लोक कारमधल्या दीपककडे जात होते तेव्हा त्याने कारमध्ये बसूनच कोणी मेले आहे का? असं विचारलं. त्यानंतर लोक चांगलेच संतापले आणि त्याला खाली उतरायला लावलं.
"सेक्टर-१२६ पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर ९४ चौकात लॅम्बोर्गिनी कारने धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. ही कार मृदुलच्या नावावर आहे आणि दीपक चालवत होता. अजमेरचा रहिवासी असलेल्या चालक दीपकला अटक करण्यात आली आहे आणि कार ताब्यात घेण्यात आली आहे. सेक्टर-१२६ पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे," अशी माहिती नोएडा पोलिसांनी दिली.