अयोध्येतील निर्मली कुंड चौकात सापडले 18 हँड ग्रेनेड, सुदैवाने मोठी घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:55 IST2022-06-27T14:45:06+5:302022-06-27T17:55:01+5:30
अयोध्येतील डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात हे हातबॉम्ब आढळले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, पोलिस याचा अधिक तपास करत आहे.

अयोध्येतील निर्मली कुंड चौकात सापडले 18 हँड ग्रेनेड, सुदैवाने मोठी घटना टळली
अयोध्या: प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील निर्मली कुंड चौकातील नाल्याजवळ अनेक हातबॉम्ब(हँड ग्रेनेड) सापडले आहेत. एका तरुणाने याची माहिती दिल्यानंतर मिलिटरी इंटेलिजन्स टीम घटनास्थळावर पोहोचली. यावेळी त्यांना झाडाझुडपांमध्ये 18 हातबॉम्ब पडलेले दिसले. सुदैवाने या सर्व ग्रेनेडच्या पिना काढल्याने मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, जिथे हातबॉम्ब आढळले, तो संपूर्ण परिसर लष्कराच्या देखरेखीखाली असतो. रात्री 10 वाजल्यानंतर येथे काही हालचाली करण्यासही बंदी असते. या ठिकाणापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर हँडग्रेनेडचा सराव करणारे लष्कराचे केंद्र आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हातबॉम्ब मिळाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, सापडलेला हँडग्रेनेड रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नष्ट करण्यात आले. अयोध्या पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. अयोध्येचे एसएसपी शैलेश पांडे यांचे म्हणणे आहे की, असे हँडग्रेनेड मिळाल्याची माहिती त्यांना डोगरा रेजिमेंटल सेंटरने कँट पोलिस स्टेशनला एका पत्राद्वारे दिली आहे. सर्व हँडग्रेनेड नष्ट करण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे नाही.