१५ दरोड्यांचे प्रयत्न, यानंतर हरवलेल्या चाव्या! जगन्नाथ पुरीच्या 'रत्नभांडारात' नेमकं किती सोनं दडलंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:00 IST2026-03-26T17:25:29+5:302026-03-26T18:00:10+5:30
पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्न भांडार ४८ वर्षांनंतर पुन्हा उघडण्यात आला आहे. सोने, चांदी आणि मौल्यवान दागिन्यांचा समावेश असलेल्या या ऐतिहासिक खजिन्याची तपासणी आणि दस्तऐवजीकरण केले जात आहे.

१५ दरोड्यांचे प्रयत्न, यानंतर हरवलेल्या चाव्या! जगन्नाथ पुरीच्या 'रत्नभांडारात' नेमकं किती सोनं दडलंय?
ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराचा खजिना सध्या चर्चेत आहे. हा खजिना 'रत्न भांडार' म्हणून ओळखला जातो. या खजिन्याचे दस्तऐवजीकरण सुरू आहे, यामुळे सुमारे ४८ वर्षांनंतर, खजिन्यातील सोन्या-चांदीचे नेमके प्रमाण उघड होईल. यामुळे पुरीच्या या प्रसिद्ध मंदिराच्या खजिन्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. खजिन्यातील वस्तू आणि त्यांच्या प्रमाणाची तपासणी बुधवारी, दुपारी १२ वाजता, शुभ मुहूर्तावर सुरू झाली आहे.
रत्न भांडाराचा इतिहास काय?
पुरी श्रीमंदिरातील रत्न भांडार मंदिराच्या बांधकामापासून अस्तित्वात आहे. ते सुमारे १२ व्या शतकातील असल्याचे बोलले जात आहे. जगन्नाथ मंदिराशी संबंधित कथांमध्ये इंद्रद्युम्न आणि गालू माधव या दोन राजांचा वारंवार उल्लेख आढळतो. रत्न भांडार हा राजा इंद्रद्युम्नाचा शाही खजिना होता, जो त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी भगवान नीलमाधवांना अर्पण केला होता. त्यानंतर देवी लक्ष्मीने त्याला या परिसरात वास्तव्य करण्याचे वचन देऊन आशीर्वाद दिला. देवीच्या कृपेने, रत्न भांडार कधीही रिकामे होणार नाही, असा आशिर्वाद दिला होता, असे बोलले जाते.
सोने आणि चांदी कोणी दान केले?
रत्न भांडारात दोन कक्ष आहेत. अंतःकोष आणि बाह्यकोष. ओडिशा मॅगझिननुसार राजा अनंगभीम देव यांनी भगवान जगन्नाथांचे दागिने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने दान केले. बाह्यकोषामध्ये भगवान जगन्नाथांचा सोन्याचा मुकुट आणि प्रत्येकी १२० तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या माळा आहेत.
भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांच्या सोन्याचा मुलामा दिलेल्या श्रीभुजा आणि श्रीपायर यांचाही उल्लेख आहे. त्यानुसार, अंतर्भागातील खजिन्यात ७४ सोन्याचे दागिने असून, प्रत्येकाचे वजन १०० तोळ्यांपेक्षा जास्त आहे. सोने, हिरे, प्रवाळ आणि मोती यांची बनवलेली ताटेही तिथे आहेत. खजिन्यात १४० हून अधिक चांदीचे दागिनेही ठेवलेले आहेत. भक्त पुरी मंदिराच्या रत्न भांडाराला अत्यंत आदराने पाहतात, याला भगवान जगन्नाथांचा खजिना मानले जाते. या रत्न भांडारात भगवान जगन्नाथांना अर्पण केलेले मौल्यवान सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने ठेवले आहेत.
या आधी कधी 'रत्न भांडार' उघडले होते?
रत्न भांडार ४८ वर्षांपूर्वी, १३ मे १९७८ रोजी उघडण्यात आले. ही प्रक्रिया २३ जुलै १९७८ पर्यंत सुरू होती. मोजणीमध्ये ४५४ सोन्याच्या मिश्रधातूच्या वस्तू (१२८.३८ किलो), २९३ चांदीच्या वस्तू (२२१.५३ किलो) आणि अनेक मौल्यवान रत्नांची नोंद झाली. रत्न भांडार १९०५ आणि १९२६ मध्ये देखील उघडण्यात आले होते. २०१८ मध्ये, विधानसभेला रत्न भांडाराच्या अस्तित्वाची माहिती देण्यात आली, यात असे म्हटले होते की, त्यात मौल्यवान रत्ने जडवलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या १२,८३१ पेक्षा जास्त भारी होत्या. यामध्ये चांदीची भांडी आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या २२,१५३ भारी देखील होत्या.
'रत्न भांडार'ची चावी कधी हरवली होती?
२०१८ मध्ये, ओडिशा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रत्न भांडार पुन्हा उघडण्याचे निर्देश दिले. ४ एप्रिल २०१८ रोजी, न्यायालयाच्या आदेशानुसार १६ लोकांचे एक पथक रत्न भांडार येथे पोहोचले, पण चावी हरवल्याचे लक्षात आल्याने ते कोठार उघडता आले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ४ जून २०१८ रोजी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. चौकशी समितीने २९ नोव्हेंबर २०१८ रोजी चावीसंदर्भातील आपला अहवाल सरकारला सादर केला, परंतु सरकारने तो सार्वजनिक केला नाही आणि ती चावी सापडली नाही.