कुख्यात ‘मंगडू’सह १४ जहाल माओवादी ठार; सुकमा-बिजापूर सीमावर्ती भागात धुमश्चक्री सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 09:50 IST2026-01-04T09:50:46+5:302026-01-04T09:50:46+5:30
माओवाद्यांकडून एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या घातक रायफल्ससह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

कुख्यात ‘मंगडू’सह १४ जहाल माओवादी ठार; सुकमा-बिजापूर सीमावर्ती भागात धुमश्चक्री सुरूच
सुकमा/बिजापूर : छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांनी ३ जानेवारी रोजी माओवाद्यांना दणका दिला. सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या पहाटे राबविलेल्या मोहिमेत १४ माओवादी ठार झाले. सुकमा जिल्ह्यात १२, तर बिजापूर जिल्ह्यात २ मृतदेह हाती लागले असून, मृतांमध्ये कोंटा एरिया कमिटी सचिव ‘मंगडू’चा समावेश आहे.
दरम्यान, ९ जून २०२५ रोजी छत्तीसगडच्या कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आकाश राव गिरेपुंजे हे चकमकीत शहीद झाले होते. ठार झालेले सर्व माओवादी या चकमकीत सहभागी होते, त्यामुळे गिरेपुंजे यांच्या हत्येचाही जवानांनी हिशेब चुकता केला आहे.
एके-४७ सह माेठा शस्त्रसाठा हस्तगत
चकमक संपल्यानंतर करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत १४ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. माओवाद्यांकडून एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या घातक रायफल्ससह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
सुकमाचे पोलिस अधीक्षकांच्या माहितीनुसार, परिसरात अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने मोहिमेचे ठिकाण गोपनीय ठेवले असून, कारवाई अद्याप सुरूच आहे.