Explosion At Vedanta Power Plant: छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात असलेल्या वेदांता लिमिटेडच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात मंगळवारी दुपारी मोठा अपघात झाला. या प्रकल्पातील बॉयलरचा हाय-प्रेशर स्टीम पाईप फुटल्याने झालेल्या प्रचंड स्फोटात आतापर्यंत १४ कामगारांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शक्ती जिल्ह्यातील सिंहितराई गावात वेदांताचा १,२०० मेगावॅटचा कोळसा आधारित वीज प्रकल्प आहे. मंगळवारी दुपारी २:३० च्या सुमारास, बॉयलरकडून टर्बाइनकडे उच्च दाबाची वाफ नेणाऱ्या नळीमध्ये अचानक गळती झाली आणि मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घटनास्थळी देखभाल आणि रंगाचे काम करणाऱ्या कामगारांना वाचण्याची संधीही मिळाली नाही. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि एकच खळबळ उडाली.
मृतांचा आकडा वाढला
शक्ती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर १० कामगारांनी रुग्णालयात उपचारादरम्यान जीव गमवला. जवळपास २० कामगार रायगड आणि बिलासपूरमधील विविध रुग्णालयात उपचार घेत असून, ५ जणांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
पश्चिम बंगालमधील कामगार अजित दास कार यांनी सांगितले की, "आम्ही नुकतेच दुपारचे जेवण संपवले होते आणि अचानक एखादा बॉम्ब पडल्यासारखा मोठा आवाज झाला. मी उंचावर काम करत असल्याने थोडक्यात वाचलो, पण खाली असणारे कामगार आगीच्या विळख्यात सापडले आणि भाजले गेले."
मोठी भरपाई आणि चौकशीचे आदेश
या घटनेनंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत कामगारांच्या वारसांना सरकारकडून ५ लाख रुपये तर कंपनीकडून ३५ लाख रुपये तसेच कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. तर जखमी कामगारांना सरकारकडून ५०,००० रुपये तर कंपनीकडून १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
दरम्यान, वेदांताने २०२२ मध्ये अथेना छत्तीसगड पॉवर लिमिटेडकडून हा प्रकल्प विकत घेतला होता. यातील ६०० मेगावॅटचे एक युनिट कार्यरत असून दुसऱ्या युनिटचे बांधकाम सुरू आहे. स्फोट झाला तेव्हा उपकंत्राटदार एनजीएसलेचे कर्मचारी तिथे काम करत होते. सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मृतांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
Web Summary : A boiler explosion at a Vedanta power plant in Chhattisgarh's Shakti district killed 14 workers and critically injured over 20. High-pressure steam pipe rupture caused the blast. Compensation and investigation ordered by the government. The plant was acquired from Athena Chhattisgarh Power in 2022.
Web Summary : छत्तीसगढ़ के शक्ति जिले में वेदांता पावर प्लांट में बॉयलर विस्फोट से 14 श्रमिकों की मौत हो गई और 20 से अधिक गंभीर रूप से घायल हो गए। उच्च दबाव वाली भाप पाइप फटने से विस्फोट हुआ। सरकार द्वारा मुआवजे और जांच के आदेश दिए गए। प्लांट को 2022 में एथेना छत्तीसगढ़ पावर से अधिग्रहित किया गया था।