भेसळयुक्त दुधाचे १३ बळी; सात जणांची मृत्यूशी झुंज, तपासणीत आढळली विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 06:22 IST2026-03-13T06:22:02+5:302026-03-13T06:22:43+5:30
पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळीच्या दुधामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली आहे.

भेसळयुक्त दुधाचे १३ बळी; सात जणांची मृत्यूशी झुंज, तपासणीत आढळली विषबाधा
राजामहेंद्रवरम (आंध्र प्रदेश) : पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळीच्या दुधामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३ झाली आहे. सात जणांवर राजामहेंद्रवरममधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम-१९४ आणि सीआरपीसीच्या कलम-१७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या २२ फेब्रुवारी रोजी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूत्रमार्गाचा त्रास, उलट्या, पोटदुखी सुरू झाली होती. लालाचेरुवूच्या चौडेश्वरनगर आणि स्वरूपनगर परिसरात पुरवल्या जाणाऱ्या दुधाच्या सेवनामुळे आजारी पडल्याचे लक्षात आल्यांनतर कारवाई सुरू करण्यात आली. यादरम्यान १३ जणांना प्राण गमवावे लागले.
तपासणीत आढळली विषबाधा
रुग्णांच्या मूत्र व रक्ताचे नमुने तपासण्यात आले तेव्हा त्यांच्या रक्तातील युरिया आणि सीरम क्रिएटिनिनची पातळी वाढल्याचे स्पष्ट झाले. विषारी पदार्थाच्या सेवनामुळे ही पातळी वाढते. त्यानंतर दुधाच्या भेसळीतून हा भयंकर प्रकार घडला असल्याचे संकेत मिळाले होते.