महाकुंभमध्ये १२९ वर्षांचे बाबा प्रकटले; मुळचे बांगलादेशचे असलेल्या बाबांचा पद्मश्रीने सन्मान, पाहण्यासाठी लोकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 14:24 IST2025-02-02T14:23:56+5:302025-02-02T14:24:25+5:30
Paryagraj Mahakumbh: बाबा शिवानंद हे मुळचे बांगलादेशचे आहेत. ते श्री हटा महकमा हरीगंज जिल्ह्यातील ठाकुरवादी घराण्याचे आहेत.

महाकुंभमध्ये १२९ वर्षांचे बाबा प्रकटले; मुळचे बांगलादेशचे असलेल्या बाबांचा पद्मश्रीने सन्मान, पाहण्यासाठी लोकांची गर्दी
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभला चेंगराचेंगरी, आगींचे गालबोट लागलेले असताना 129 वर्षांच्या वयोवृद्ध बाबा शिवानंद यांनी हजेरी लावली आहे. बाबा शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. आजही हे बाबा चालत, फिरत आहेत. यामुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. यामुळे या बाबांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
बाबा शिवानंद यांच्या आधार कार्डवर जन्मतारीख ही ८ ऑगस्ट १८९६ अशी नोंद आहे. २०२५ च्या महाकुंभमेळ्यात संगमाच्या वाळूवर स्वामी शिवानंदांची छावणी उभारण्यात आली आहे. शिवानंद हे पूर्णपणे निरोगी आहेत आणि सर्वांशी बोलतातही. बाबा १२९ वर्षांचे झाले आहेत. योग हे त्यांच्या दिर्घायुषी होण्यमागचे रहस्य आहे, असे सांगितले जाते. ते योग करण्यासाठी लोकांना जोडत असतात.
बाबा शिवानंद हे मुळचे बांगलादेशचे आहेत. ते श्री हटा महकमा हरीगंज जिल्ह्यातील ठाकुरवादी घराण्याचे आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनाथ गोस्वामी तर आईचे नाव भगवती आहे. त्यांचे आई वडील भिक्षा मागून चरितार्थ चालवत होते. ते ब्राम्हण परिवारातील आहेत. भिक्षा मिळाली नाही तर त्यांना व कुटुंबाला उपाशीच रहावे लागायचे. लहानपणीच बाबा शिवानंद यांनी त्रास भोगला. यामुळे बाबांना त्यांच्या आई वडिलांनी नवदीपच्या एका वैष्णव संतांकडे पाठविले. तेच शिवानंद यांचे नंतर गुरु बनले. शिवानंद यांची एक बहीणही होती. त्या स्वर्गवासी झाल्या आहेत.
बाबांच्या लहानपणीच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. यावेळी बाबा आश्रमातून घरी गेले, आई वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि वडिलांनी पुजलेली नारायण शिळा व आईने पुजलेले शिवलिंग सोबत घेऊन पुन्हा आश्रमात आले व लोकांची सेवा करू लागले.
पहाटे तीन वाजताच दिनचर्या...
बाबा पहाटे तीन वाजता झोपेतून उठतात. दिवसभर ते जप, ध्यान, जगाच्या कल्याणाची कामना, सेवा आणि सर्व प्रकारची निःस्वार्थ कामे करतात. आहारात फक्त उकडलेल्या भाज्या आणि इतर काही गोड पदार्थ असतात. बाबा तळलेले अन्न खात नाहीत. बाबांचे आवडते काम म्हणजे गरीब, दुःखी आणि दुःखी लोकांना मदत करणे आणि त्यांची सेवा करणे हे आहे.