लग्नाला जातो आम्ही...आंध्र प्रदेशातील 100 आमदारांची सामूहिक रजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 18:24 IST2017-11-24T18:14:49+5:302017-11-24T18:24:35+5:30
आमदारांना सर्वाधीक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. मागील वर्षी या आमदारांचा पगार 95 हजारांवरुन 1 लाख 25 हजार इतका वाढविण्यात आला होता.

लग्नाला जातो आम्ही...आंध्र प्रदेशातील 100 आमदारांची सामूहिक रजा
हैदराबाद- आमदार, खासदार असो वा नगरसेवक लोकप्रतिनिधींना आपापल्या मतदारसंघातील लोकांच्या सुख-दुःखाच्या वेळेस उपस्थित राहावे लागते. सत्यनारायण पूजा, लग्न अशा कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांचं मन राखावं लागतं. आंध्र प्रदेशमध्ये केवळ लग्नसमारंभांना उपस्थित राहण्यासाठी 100 आमदारांनी रजा टाकल्या आहेत. राज्याध्ये या काळात तब्बल 1.2 लाख लग्ने लागणार आहेत त्यामुळे आमदारांच्या संबंधीत लोकांच्या लग्नाला या लोकप्रतिनिधींना जावे लागणार आहेत. दोन दिवस उपस्थित राहू शकणार नाही असे या आमदारांनी सांगितल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या आठवड्यात अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर भाजपाच्या विष्णू कुमार राजू यांनी या विवाहसोहळ्यांना उपस्थित राहण्यासाठी रजेचा विषय सभागृहामध्ये काढला. त्यावर सर्व आमदारांनी ही उत्तम कल्पना आहे असे सांगत त्याला अनुमोदन दिले. राजू यांनी ही कल्पना मांडल्यावर सभापती कोडेला शिवप्रसाद राव आणि अर्थमंत्री यानमाला रामकृष्णंदु यांनी सर्वांना विवाहसोहळ्यांना जायचं आहे आणि तुमच्या भावना आम्ही समजू शकतो असे सांगत बुधवारपासून रविवारपर्यंत सभागृहाच्या कामकाजाला विश्रांती देऊन, थेट सोमवारीच कामकाज होईल असे स्पष्ट केले.
महिन्याच्या आरंभी सुरु झालेले अधिवेशन 30 तारखेस संपणार आहे. आंध्र प्रदेशाच्या विधानसभेत सध्या 176 आमदार आहेत. त्यापैकी विरोधी पक्षांचे 67 आमदार आहेत. वायएसआर कॉंग्रेसने या संपुर्ण अधिवेशनावर बहिष्कार घातला आहे.
गेल्या आठवड्याच अॅगटेक परिषदेत सहभागी होण्यासाठी या आमदारांनी दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला नव्हता. आमदारांना सर्वाधीक पगार देणाऱ्या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशचाही समावेश आहे. मागील वर्षी या आमदारांचा पगार 95 हजारांवरुन 1 लाख 25 हजार इतका वाढविण्यात आला होता.