Madhya Pradesh Road Accident: मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूर रोडवरील सिमरियाजवळ एका खाजगी बस आणि पिकअप वाहनामध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात एका चिमुरड्यासह १० जणांचा मृत्यू झाला असून ३१ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, ही बस मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सार्वजनिक कार्यक्रमातून परतत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथील पोलीस मैदानावर मुख्यमंत्री मोहन यादव यांचा विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपून ४० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस परतत असताना सिमरियाजवळ हा अपघात झाला. बस एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून येणाऱ्या लसणाने भरलेल्या पिकअप व्हॅनला तिने जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बस अनियंत्रित होऊन पलटली.
अपघाताचे विदारक दृश्य
या अपघातातील दृश्ये अत्यंत भयानक होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेमुळे काही प्रवाशांचे हात शरीरापासून वेगळे झाले, तर काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मृतांमध्ये बसमधील ८ प्रवासी आणि पिकअपचा चालक व क्लिनर यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटली असून त्यात बस चालक कमल (५४), पिकअप चालक रवी धारे (४०), भागवती (४५), दौलत (४०), सकुन यादव (४५), रामदास (४०), रमेश (३५), सिया बाई (४०) आणि ७ वर्षांच्या वंश यांचा समावेश आहे.
ग्रीन कॉरिडॉरद्वारे जखमींना मदत
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने अपघातस्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. ६ रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. ३१ जखमींपैकी ४ ते ५ जणांची प्रकृती चिंताजनक असून, एकाला उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडून मदत जाहीर
या घटनेवर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सवरुन संवदेना व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि गंभीर जखमींना १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींवर शासकीय खर्चाने मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत."छिंदवाडा-नागपूर रोडवरील हा अपघात हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करतो. जबलपूरहून डॉक्टरांचे पथक छिंदवाडा आणि नागपूरला पाठवण्याचे निर्देश दिले असून, आरोग्य विभाग यावर सतत लक्ष ठेवून आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
प्रभारी मंत्र्यांना धाव घेण्याचे आदेश
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री राकेश सिंह यांना त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने छिंदवाडा गाठण्याचे आदेश दिले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
Web Summary : A bus returning from Madhya Pradesh CM's event collided with a pickup vehicle, killing 10, including a child, and injuring 31. The accident occurred near Chhindwara. Financial aid and free treatment announced.
Web Summary : मध्य प्रदेश के सीएम के कार्यक्रम से लौट रही एक बस एक पिकअप वाहन से टकरा गई, जिसमें एक बच्चे सहित 10 लोगों की मौत हो गई और 31 घायल हो गए। दुर्घटना छिंदवाड़ा के पास हुई। वित्तीय सहायता और मुफ्त इलाज की घोषणा की गई।