नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता नाशिक जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीतील ४० वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मालेगावसाठी नेमणूक करून कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लावला आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेच्या हद्दीला लागूनच जिल्हा परिषदेची हद्द असून, तेथील ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी घेतानाच शहरी भागातही आपली सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हा परिषद अग्रणी ठरली आहे. राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे डीनसह दोघा डॉक्टरांची नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरी दिवसागणिक रुग्णांची वाढत असलेली संख्या, त्यांच्या संपर्कात येणारा संशयित रुग्ण पाहता या साऱ्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कोरोना नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या लीना बनसोड यांनी ४० वैद्यकीय अधिकारी, नर्स, औषध निर्माता यांची सेवा मालेगाव शहरासाठी वर्ग केली आहे.------सध्या संचारबंदी व लॉकडाउनमुळे ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे बंद असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी स्थगित करण्यात आली आहे, परिणामी या कामासाठी लागणारे मनुष्यबळ मालेगावकडे वळविण्यात आले आहे. या अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर घरोघरी जाऊन रुग्ण तपासणीसाठी केला जाणार आहे.
जिल्हा परिषद धावली मालेगावच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:13 IST