Zilla Parishad by-election in December? | जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये?

जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक डिसेंबरमध्ये?

ठळक मुद्देजिल्ह्यात चार जागा : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या बारा व पंचायत समित्यांच्या आठ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आपली तयारी चालविली असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आयोगाने सर्व रिक्त जागांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केल्याने साधारणत: डिसेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नांदगाव पंचायत समितीच्या न्यायडोंगरी व निफाड पंचायत समितीच्या नांदुर्डी अशा दोन जागा रिक्त आहेत. न्यायडोंगरीच्या सदस्या आशा आहेर या उपसभापती होत्या तर नांदुर्डी गणातील सूर्यवंशी या दोघांचे जातवैधता पडताळणी नसल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर रोजी या मतदारसंघात ज्या ज्या मतदारांची नावे यादीत असतील ती ग्राह्ण धरण्याचे निर्देश दिले असून, ही यादी २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागविण्यात येतील. ६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून, ८ नोव्हेंबर रोजी त्यावर सुनावणी व त्याचदिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गटात व गणात मतदारांना पाहण्यासाठी ही यादी ठेवण्यात येणार आहे.
साधारणत: मतदार यादी जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जातो. त्यामुळे मतदार यादी नोव्हेंबरमध्येच जाहीर होणार असल्याने साधारणत: डिसेंबरमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम घोेषित करताच राजकीय वर्तुळातही पोटनिवडणुकीच्या दृष्टीने इच्छुक तयारीला लागले असून, प्रत्येकाने यापूर्वीच आपली चाचपणी करून ठेवली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजीनामा
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव व कळवण तालुक्यातील मानूर या दोन जिल्हा परिषदेच्या जागा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रिक्त झाल्या आहेत. खेडगाव गटातील सदस्य माजी आमदार धनराज महाले यांनी पक्षांतर करून राष्टÑवादीत प्रवेश केला व लोकसभेची उमेदवारी केली होती तर मानूर गटाच्या सदस्या डॉ. भारती पवार यांनीदेखील राष्टÑवादी सोडून भाजपात प्रवेश केला व उमेदवारी केली होती. त्यात त्या निवडूनही आल्या. दोन्ही सदस्यांनी निवडणुकीपूर्वीच राजीनामा दिल्याने या दोन्ही जागा गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहेत.

Web Title: Zilla Parishad by-election in December?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.