A youth was injured firing in nashik | नाशिकमध्ये गोळीबारात एक युवक जखमी

नाशिकमध्ये गोळीबारात एक युवक जखमी

नाशिक : वणी-सापुतारा रोडवर नाशिक शहराजवळच्या गंगापूर गावातील एका युवकावर  गोळीबार केल्याची घटना आज घडली. हा प्रकार टोळक्यांच्या वादातुन झाल्याचे समजते.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, निखील कटारे (रा. गंगापुर) हा आपल्या तीन मित्रांसमवेत सापुतारा येथे फिरण्यासाठी गेला होता. परतीच्या प्रवासाला असताना सुरगाणा तालुक्यातील वताबारी गावाजवळ कटारे व त्याचे मित्र लघुशंकेसाठी वाहनातून खाली उतरले. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने आपल्या जवळील पिस्तुलमधुन कटारेवर गोळीबार करत पलायन केले. यामध्ये कटारेच्या जबड्यात गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी त्याच्या मित्रांनी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात  दाखल केले आहे.

गोळीबाराची घटना घडल्यानंतर वणी  व सुरगाणा पोलीस यांच्या हद्दीच्या वादात यंत्रणेचे दुर्लक्ष झाले परिणामी प्रतिसाद उशिरा मिळाला आणि हल्लेखोर सहज पसार झाले. या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यानंतर तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरार्यंत पोलीसांच्या हाती या घटनेबाबत कुठल्याही प्रकारचे धागेदोरे लागलेले नव्हते.

Web Title: A youth was injured firing in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.