नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू
By अझहर शेख | Updated: April 28, 2025 15:35 IST2025-04-28T15:33:08+5:302025-04-28T15:35:58+5:30
युवकाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने घेरून दगड, फरशीच्या तुकड्यांनी ठेचून केला खून

नाशिकमध्ये भर रस्त्यात युवकाचा दगडाने ठेचून खून; अल्पवयीन मारेकऱ्यांचा शोध सुरू
नाशिक : शहर सोमवारी (दि.२८) पुन्हा खुनाच्या घटनेने हादरले. मागील भांडणाची कुरापत काढून सिडको-कामटवाडे भागातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका युवकाला अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने घेरून दगड, फरशीच्या तुकड्यांनी ठेचून खुन केल्याची धक्कादायक घटना घडली. करण चौरे (१८,रा.संत कबीरनगर झोपडपट्टी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.
नाशिक शहर व परिसरात खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सिडको-कामटवाडे भागात असलेल्या एका स्मशानभूमीच्या रस्त्यावर अल्पवयीन मारेकऱ्यांच्या टोळक्याने सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास करण यास घेरले. तेथे मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन हाणामारी सुरू झाली. यावेळी तीन ते चार जणांनी आजुबाजुला पडलेले दगड, फरशीचे तुकड्याने करणवर हल्ला चढविला. डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर टाेळक्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत करण मृत्युमुखी पडला होता. पंचनामा करून त्याचा मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. करण हा महात्मानगरजवळच्या संत कबीरनगर झोपडपट्टीत राहत होता. तो काही कामासाठी कामटवाडे भागात गेला होता. त्याला मारणारेदेखील या झोपडपट्टीतील असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.