सिडकोत रिक्षाचालकाची लाकडी दंडुक्याने हत्त्या; संशयितांना अटक करा; मग मृतदेह ताब्यात घेऊ: नातेवाईकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:35 IST2017-12-27T22:00:22+5:302017-12-27T22:35:26+5:30
मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.

सिडकोत रिक्षाचालकाची लाकडी दंडुक्याने हत्त्या; संशयितांना अटक करा; मग मृतदेह ताब्यात घेऊ: नातेवाईकांची मागणी
नाशिक : सिडको परिसरातील डीजीपीनगरभागातील महलक्ष्मीनगर येथे अज्ञात टोळक्याने एका तरुणाची हत्त्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या हत्त्येमागील कारण अद्याप पुढे आलेले नाही. घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले असून तपास सुरू आहे. दरम्यान, मयत तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पाठविला असता रुग्णालयात जमलेल्या मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश करुन गोंधळ घातल्याने जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मयत तरुणाचे नाव साहेबराव जाधव असल्याचे समजते. या घटनेनंतर महलक्ष्मीनगर भागातही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर कड यांनी सांगितले. संशयितांची नावे मयत जाधव याच्या भावाने पोलिसांकडे स्पष्ट करत संशयित हे साहेबरावला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत होते, अशी माहितीही दिल्याचे समजते. एकूणच पाच ते सहा हल्लेखोर या घटनेत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.