मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून नाशिकला युवा शेतक-याने रेल्वे रुळावर संपविली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 21:53 IST2017-12-18T19:36:01+5:302017-12-18T21:53:36+5:30
या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून नाशिकला युवा शेतक-याने रेल्वे रुळावर संपविली जीवनयात्रा
नाशिक : शेती पिकविण्यासाठी घेतलेले कर्ज फेडताना आलेल्या नैराश्यातून नाशिकमधील भगूर गावातील युवा शेतक-याने रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेपुढे जीवनयात्रा संपविली; तत्पुर्वी त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी भाजपाच्या फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काही महिन्यांपुर्वी केली; मात्र त्याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतक-यांच्या राज्यातील आत्महत्त्या रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली आहे, असेही सरकारी दरबारातून वारंवार सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतक-याच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्यास सरकारकडून कुठलीही आश्वासने पुर्ण केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यापोटी नाशिकमधील भगूर गावात राहणारे जगदीश बहिरू शिरसाठ (३७) या युवा शेतक-याने सोमवारी रेल्वे रुळावर आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्हा हा बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो; मात्र या जिल्हयतही शेतक-यांच्या आत्महत्त्येचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. एकूणच शेतक-यांच्या आत्महत्त्या हा गंभीर प्रश्न बनत चालला असून राज्य सरकारने यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे.
शिरसाठ यांच्यावर कर्जाचा बोझा होता. त्यांना पीक कर्जाच्या अनुदानाची रक्कम बॅँकेतून मिळाली नाही. असे त्यांनी चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. चिठ्ठीमधील त्यांच्या व्यथ्या त्यांच्याच शब्दांत ‘‘बॅँकेकडून पुढील आठवड्यापासून रक्कम मिळण्यास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले. आपल्या शेतीवर ९५ हजार रुपये कर्ज आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरु देत नाही आणि कर्जामुळे अडचणीत सापडलो आहे. त्यामुळे मी आत्त्महत्त्या करीत आहे, मला कोणीही आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केलेले नाही. सदर माझी पत्नी सुरेखा हिस न्याय मिळावा... आपला शेतकरी, जगदीश बहिरु शिरसाठ’’