दुचाकींना अपघात होऊन महिलेसह युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 17:15 IST2020-08-12T17:14:45+5:302020-08-12T17:15:08+5:30
दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

दुचाकींना अपघात होऊन महिलेसह युवक ठार
नाशिक : रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला जेवणाचा डबा घेऊन दुचाकीवरुन मार्गस्थ होताना दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या लिलाबाई राजु जाधव (४२,रा.आगरटाकळी) या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मनसाराम चव्हाण (३६) हे त्यांच्या अॅक्टिवा दुचाकीवरुन (एम.एच१५ सीएस ८६३९) लिलाबाई यांच्यासोबत रुग्णालयात जात होते. यावेळी पाठीमागे बसलेल्या लिलाबाई यांचा तोल गेल्याने ते दुचाकीवरुन खाली कोसळल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत पेठरोडवरुन बुलेट चालवित मार्गस्थ होणा-या युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. कन्हैया पिंगळे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. कन्हैया हा बुलेटवरुन (एम.एच१५ एफआर८६३०) विना हेल्मेट मार्गस्थ होत होता. यावेळी पेठकडून नाशिककडे येणा-या एका अज्ञात वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली. या धडकेत कन्हैया रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची तक्रार त्याचा भाऊ जयराम पिंगळे याने दिली आहे. फिर्यादीवरुन म्हसरुळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.