१५ लाख नागरिकांच्या योगाचा योग
By Admin | Updated: June 21, 2015 01:30 IST2015-06-21T01:29:51+5:302015-06-21T01:30:30+5:30
१५ लाख नागरिकांच्या योगाचा योग

१५ लाख नागरिकांच्या योगाचा योग
नाशिक : जगाला देणगी असलेला भारतीय संस्कृतीतील योग दिन साजरा करण्यासाठी नाशिककर सरसावले असून, जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्या लाखो नागरिकांसह सुमारे १२ लाख विद्यार्थी यात सहभागी होणार असल्याने सुमारे १५ लाख नागरिकांच्या योगाचा योग रविवारी सकाळी जुळून येणार आहे. यासाठी विविध स्तरांवर पूर्वतयारीही सुरू झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शाळांच्या प्रत्येकी एक शिक्षकाला योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने पुरस्कृत केलेल्या या दिवसासाठी देशभरातील सर्वच शाळा, महाविद्यालये आणि संस्था या सहभागी होणार आहेत. पाऊस नसल्यास सर्वच शाळांचे परिसर योगक्रियांमध्ये गुंतलेले दिसून येतील. त्यासाठी शासकीय पातळीवरची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, विविध संस्थांनीही त्यासाठी उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात आर्ट आॅफ लिव्हिंग, पतंजली, वैद्यकीय संस्था, धार्मिक संस्था यांचाही समावेश आहे.
शालेय विभागातून जिल्ह्यातील जवळपास पाच हजार शाळांमधून त्याची तयारी पूर्ण झाली असून, तीन दिवसांपासून योग जाणणारे तज्ज्ञ शिक्षकांना त्याची शिकवणी देत होते. सुमारे एक हजार शिक्षकांना त्याचे शिक्षण देण्यात आले असून, तेच योगदिनाच्या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देणार आहेत. तालुका स्तरावर शाळेच्या मैदानात हे कार्यक्रम होणार असून, शहरात अधिकारी, पदाधिकारी केटीएचएम मैदानावर सकाळी ७ ते ७.३३ या दरम्यान योग दिवस साजरा करणार आहे. केटीएचएम महाविद्यालयात जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंसह सुमारे दहा हजार विद्यार्थी योग दिवस साजरा करणार आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात पहिली ते बारावीचे सुमारे १२ लाख ४५ हजार विद्यार्थी त्या त्या ठिकाणी शाळेच्या मैदानावर हा दिवस सादर करणार आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे २ लाख ७५ हजार विद्यार्थी, तर खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील इतर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र मोगल यांनी दिली.
आर्ट आॅफ लिव्हिंग
आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेच्या वतीने आसारामबापू आश्रमाजवळील शगुन हॉलमध्ये सकाळी ६ ते ८ या दरम्यान योग दवस साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी योगाचे फायदेही सांगण्यात येणार आहे.
मधुमेहमुक्त भारत अभियान
आरोग्य भारती या संस्थेच्या वतीने २१ ते २८ जूनदरम्यान मधुमेहमुक्त भारत अभियानाचे आयोजन केले आहे. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमात योगाच्या सहाय्याने मधुमेहावर मात कशी मिळवता येते, याची माहिती दिली जाणार आहे. संपूर्ण देशभरात सुमारे ३००० केंद्रांवर हा उपक्रम राबविला जाणार असून, शहरात सहा ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विजय भोकरे आणि विजय कुलकर्णी यांनी केले आहे. अयप्पा मंदिर (प्रशांतनगर), अजय मित्रमंडळ (इंदिरानगर), योगविद्याधाम निसर्गोपचार केंद्र (जयभवानीरोड), महात्मा फुले सभागृह (शिवाजी चौक, सिडको), अभिनव वाचनालय (मुक्तिधाम, नाशिकरोड) या ठिकाणी सकाळी ६ वाजता हे शिबिर होणार आहे. (प्रतिनिधी)