ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार
By Admin | Updated: January 21, 2016 23:29 IST2016-01-21T23:23:57+5:302016-01-21T23:29:51+5:30
चालक ताब्यात : सुदैवाने बचावला चिमुरडा

ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार
पंचवटी : रासबिहारी रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या मालट्रक ने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत आईसोबत दुचाकीवर असलेला चार वर्षांचा चिमुरडा सुदैवाने बचावला.
मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये (एम.एच १५ ई.यु ६२४०) पेट्रोल भरून रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (पी.बी १३ क्यू ९६८७) जोरदार धडक दिली. सदर धडकेत दुचाकीस्वार विवाहिता शिल्पा जगदीश पवार (३२. अभिषेक बंगला, वृंदावन कॉलनी) हिचा जागीच मृत्यू झाला. शिल्पा या आपला चार वर्षीय मुलगा अर्णवला शाळेतून घरी घेऊन जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातात अर्णवदेखील किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी ट्रकचालक गुरुप्रित सिंग (रा.पंजाब) यास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातप्रकरणी संजय पवार यांनी ट्रकचालकाविरुद्ध फिर्याद दिली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा यांच्या पश्चात आई, वडील, सासू, सासरे, पती, भाऊ, बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)