MIDCतील महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून; सुपरवायझरनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:53 IST2025-04-22T15:53:18+5:302025-04-22T15:53:56+5:30
एकाच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.

MIDCतील महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून; सुपरवायझरनेही आत्महत्या केल्याने गूढ वाढले
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. कंपनीच्या कंपाउंडमध्ये सोमवारी सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. तर याच कंपनीतील एका कर्मचाऱ्याने गोंदे येथील आपल्या गावी गळफास लावून आत्महत्या केल्याचेही समोर आल्याने या घटनेमागचे गूढ वाढले आहे. या दोन्ही घटनांचा आपसात काही संबंध आहे का? याचा पोलिस शोध घेत आहेत.
शिल्पा अशोक पवार (२८, रा. मापरवाडी, ता. सिन्नर) असे मृत महिलेचे नाव आहे. यासंदर्भात मयत शिल्पा पवार हिचा दीर गुलाब लक्ष्मण पवार (३०) याने मुसळगाव एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीने आपल्या वहिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची फिर्याद दिली आहे. कंपनीत मयत पवार या कंत्राटी पद्धतीने कामावर होत्या, असे समजते. सदर महिला ही माळी काम करीत होती. खून होण्यापूर्वी त्या सुरक्षारक्षक कॅबिनच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे दिसून आल्या होत्या. पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरवडकर करीत आहेत.
सुपरवायझरने आपल्या गावी घेतला गळफास
महेंद्र सखाहरी रणशेवरे (४८, रा. गोंदे, ता. सिन्नर) हे याच माळेगाव येथील एका कंपनीत कामाला होता. त्याने गोंदे (ता. सिन्नर) येथे आपल्या गावी जाऊन शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दोघेही माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर होते. रणशवरे तेथे सुपरवायझर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. रणशेवरे याची कारखान्यात आल्याची एन्ट्री आहे. मात्र, बाहेर गेल्याची नोंद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रणशवरे यांच्या मृत्यूप्रकरणी वावी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा खून आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.