Nashik Crime: देशभरातून गेल्या काही दिवसांपासून जोडप्यांमधील वादांमधून हत्याकांडाच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकमध्येही हादरवणारी घटना समोर आली आहे. मद्यप्राशन केलेल्या पतीने शिवीगाळ व मारहाण करतानाच जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्याच्यावर कुऱ्हाडीने घाव घालत ठार मारणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याची कुऱ्हाडीने हत्या केली होती. पत्नीने एवढ्यावरच न थांबता त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते एका खड्ड्यात पुरले. मात्र पत्नीच्या एका चुकीमुळे ही हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या सगळ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाला वाचा फुटल्यानंतर पत्नीने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगाणा तालुक्याती मालगोंदायेथील यशवंत मोहन ठाकरे (वय ४२) ही व्यक्ती गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील मोहन मंगळू ठाकरे यांनी १२ जून रोजी सुरगाणा पोलिस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता यशवंतचा शोध सुरू केला होता. त्यात स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास केला असता यशवंतची पत्नी प्रभावती ठाकरे हिने तो काही दिवसांपासून मजुरी कामासाठी गुजरातमधील बिलीमोरा येथे गेल्याचे सांगितले. पोलिसांच्या पथकाने प्रभावतीची सखोल चौकशी केली असता तिने यशवंतचा खून केल्याची कबुली देत घटनाक्रमाचा उलगडा केला.
१४ एप्रिलपासून बेपत्ता असलेला यशवंत दोन महिन्यांनतरही घरी परत न आल्याने त्याचे कुटुंबिय चिंतेत होते. त्यांनी प्रभावतीकडे विचारणा केल्यावर बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेला असल्याचे सांगितले होते. मात्र तिच्या घराबाहेरच्या बाहेर करण्यात आलेल्या खोदकामामुळे कुटुंबियांना तिच्यावर संशय आला होता. त्यामुळे पोलिसांनी खड्डा खोदून शेणमातीने सारवलेल्या ठिकाणी खोदकाम केले. मात्र त्यावेळी काही सापडले नाही. त्यानंतर यशवंतचा भाऊ उत्तम याची पत्नी प्रभावतीला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी उत्तमच्या पत्नीला यशंवतची चप्पल दिसली. मात्र हे लक्षात येताच प्रभावतीने यशवंतची चप्पल मांडीखाली लपवली आणि तिच्यासोबत बोलणं केलं. दुसरीकडे उत्तमच्या पत्नीने घरी येऊन हा सगळा प्रकार सांगितला.
प्रभावतीवरील संशय बळावल्याने उत्तमने त्या शोषखड्ड्याकडे जाऊन पाहणी केली. त्यावेळी उत्तमला तिथून कुजलेला वास येऊ लागला आणि त्या खड्ड्यावर माशा घोंगावताना दिसल्या. त्यामुळे त्याने खड्डा खोदण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी त्याला जबर धक्का बसला. खड्ड्यामध्ये यशवंतच्या मृतदेहाचे तुकडे होते. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी यशवंतचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर प्रभावतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता कुर्हाडीने यशवंतचा खून करुन मृतदेहाचे तीन तुकडे केल्याचे तिने सांगितले. यशवंतच्या शरीराचे तुकडे गोणीमध्ये भरुन खड्ड्यात पुरण्यात आले होते. त्यावर माती, मुरूम, प्लास्टिकच्या पिशव्या टाकण्यात आल्या होत्या.