संतापजनक : विधवा पोलीस पत्नीचा हवालदाराकडूनच विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 15:00 IST2020-06-11T14:57:40+5:302020-06-11T15:00:04+5:30
सैलानी बाबा स्टॉप येथे पिडितेला शिवीगाळ करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून साडीचा पदर ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संतापजनक : विधवा पोलीस पत्नीचा हवालदाराकडूनच विनयभंग
नाशिक : कुठे टाळ्या वाजवून तर कोठे पुष्पवृष्टी करून पोलिसांचे स्वागत झाले; मात्र दुसरीकडे ‘खाकी’ला अशोभनीय असे वर्तन एका पोलीस हवालदाराकडून घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. हवालदाराविरूध्द एका पिडित विधवा पोलीस पत्नीने थेट विनयभंगाची तक्रार दिली आहे. पिडितेच्या तक्रारीवरून संशयित हवालदार खंडु सुखदेव बेंडाळे (नेमणूक, मुख्यालय नाशिक ग्रामिण, रा. जय योगेश्वर बंगला, जेलरोड) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा नाशिकरोड पोलिसांनी दाखल केला आहे.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रिद पोलीस दलाचे आहे. सध्या कोरोनाच्या कालावधीत पोलिसदलाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन अतिशय सहानुभूतीपुर्वक आणि सकारात्मक झाला आहे. समाजाच्या अपेक्षा पोलिसांकडून नक्कीच अधिकच उंचविल्या असून जनसामान्यांच्या मनात पोलिसांचे या कठोर काळातील कर्तव्यतत्परतेने वेगळे स्थान निर्माण केले आहे; मात्र या लॉकडाऊन काळातच काही पोलिसांकडून पोलीस दलाची प्रतीमा मलीन करणारे कृत्यदेखील घडले आहे. असेच कृत्य नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत घडल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक व्यवहारातून बेंडाळे यांनी पिडितेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड भागात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडिता विधवा पोलीस पत्नी आहे. बेंडाळे याने म्हसरूळ परिसरात राहणाया सदर पिडितेकडून ७० हजार रूपये ऊसनवार घेतले होते. पिडितेने त्याच्याकडे रकम मागितील असता त्याचा राग मनात धरून सैलानी बाबा स्टॉप येथे पिडितेला शिवीगाळ करत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून साडीचा पदर ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला सहायक पोलीस निरिक्षक मनीषा राऊत या करीत आहेत.