आमदारांना रथावर मिरवून मागितलेला जनादेश कुणासाठी?

By किरण अग्रवाल | Published: September 22, 2019 02:09 AM2019-09-22T02:09:36+5:302019-09-22T02:13:52+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेत प्रामुख्याने नाशकातील तिघा विद्यमान आमदारांनाच त्यांच्यासोबत ‘जनादेश’ मागण्याची संधी लाभल्याने शहरातील व जिल्ह्यातीलही अन्य तिकिटेच्छुकांची उलघाल होणे स्वाभाविक ठरले. त्यामुळे तिकीट मिळणाऱ्यांखेरीजच्या इच्छुकांची नाराजी त्यांना निष्क्रियतेकडे ओढून घेऊन जाऊ शकते.

Who is the mandate to chase MLAs in chariots? | आमदारांना रथावर मिरवून मागितलेला जनादेश कुणासाठी?

आमदारांना रथावर मिरवून मागितलेला जनादेश कुणासाठी?

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची कृती व पालकमंत्र्यांची उक्ती यात तफावतआता अन्य तिकिटेच्छुकांच्या सक्रियतेची चिंतापक्षकार्य करणारे वेगळे आणि संधी उपभोगणारे वेगळे, असे गट आकारास येतात

सारांश


महाजनादेश यात्रेचा नाशकात समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक आमदारांना त्यांच्या त्यांच्या परिसरात रथावर सोबत घेऊन जनादेश मागितल्याने त्यांचे तिकीट कापले जाण्याच्या चर्चा निरर्थक आहेत की काय, असा प्रश्न तर पडावाच; पण या ‘मिरवणुकी’मुळे अवसान गळालेल्या अन्य इच्छुकांच्या बळाचा उद्या निवडणूक प्रचारात कितपत उपयोग घडून येईल याबाबतची शंका बळावून जाणेही स्वाभाविक ठरावे.

विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपलाच जनादेश मिळवण्यासाठी फडणवीस यांनी काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात मोठ्या धडाक्यात झाला. जागोजागचे स्वागत, पुष्पवर्षाव आदी बरेच काही ‘साजरे’ झाले; अगदी भरपावसातही नागरिकांचा प्रतिसाद लाभला, पण हे सारे होत असताना लक्षवेधी ठरली ती नाशकातील तीनही आमदारांची जनादेश रथावरील उपस्थिती. विशेषत: प्रभावहीन कामाच्या आरोपांमुळे ज्यांची तिकिटे यंदा कापली जाण्याच्या चर्चा घडत आहेत, अशांनाच मुख्यमंत्र्यांनी सोबत घेऊन त्या त्या मतदारसंघाच्या क्षेत्रात मिरवल्याने या संबंधितांचा उत्साह दुणावून जीव भांड्यात पडला असावा खरा; पण त्यामुळे अन्य इच्छुकांच्या आघाडीवर स्वस्थता ओढवली तर आश्चर्य वाटू नये. जनादेश यात्रेच्या ‘रोड शो’साठी गर्दी जमवणारे रस्त्यावर व विद्यमान रथावर राहिल्यानेच दुसºया दिवशी संबंधितांनी पंतप्रधान मोदींच्या सभेकडे काहीसे दुर्लक्ष केले. परिणामी सभेला अपेक्षेएवढी गर्दी होऊ शकली नाही व खुर्च्या रिकाम्या राहिल्या, असा या संदर्भातील तात्काळचा ‘डेमो’ सहज लक्षात घेता येणारा व बरेच काही सांगून जाणारा ठरावा.

मुळात, भाजप हा केडर बेस पक्ष आहे. यात पक्ष पदाधिकाऱ्यांना अधिक महत्त्व दिले जाण्याची प्रथा आता आतापर्यंत राहिली; पण ही परिस्थिती हळूहळू बदलते आहे. पक्षाच्या बळावर लोकप्रतिनिधित्वाची झूल अंगावर चढलेले लोक नंतर स्वत:चे अस्तित्व प्रबळ करताना पक्षाच्या उपयोगी पडत नाहीत, हा सर्वपक्षीय अनुभव आहे. यामुळे पक्षकार्य करणारे वेगळे आणि संधी उपभोगणारे वेगळे, असे गट आकारास येतात. अशावेळी पक्ष-संघटनेतील लोकांना गोंजारणे गरजेचे असते. त्यादृष्टीने विमानतळ व हेलीपॅडवर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी तशी संधी संबंधितांना दिली गेली. पक्ष कायकर्ते व बाहेरून पक्षात आलेले असे सारेच मोदींना भेटले आणि त्याभेटीने भारावलेतही, पण जनादेश यात्रेत तसे घडले नाही. खरे तर ही यात्रा पक्षाला जनादेश मागण्यासाठी होती, त्यामुळे उद्या उमेदवारी भले कोणासही लाभो, परंतु सर्वच संभाव्य उमेदवारांना काही वेळ रथावर आरूढ होण्याची संधी दिली गेली असती तर खºया अर्थाने सर्वांचाच हुरुप वाढून ते पक्ष बळकटीकरणास उपयोगी ठरून गेले असते. पक्षात बाहेरून आलेल्यांचेही जाऊ द्या; पण पक्ष पदाधिकाºयांना तरी अशी संधी मिळणे अपेक्षित होते. कारण ते अंतिमत: पक्षाच्याच कामी आले असते. उद्या निवडणुकीत प्रचाराला व मतदान केंद्रावर पक्षाचा ‘बूथ’ लावायला हीच मंडळी कामी येणारी आहे, पक्षासाठीचा जनादेश मिळवायला तेच झटत असतात, हे पक्षाने विसरायला नको.

महत्त्वाचे म्हणजे, एकीकडे भाजपच्या नाशकातील उमेदवारांचे काय, या प्रश्नावर ते ‘गंगामैयाला ठाऊक’ असे सांगताना पालकमंत्री गिरीश महाजन दिसून आलेत. शिवाय, कोण वादात आहे, कुणाचे काम कसे आहे हे पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितल्याने उमेदवारीबाबतचा संभ्रम टिकून आहे. बरे, महाजन यांची स्वत:ची संपर्क यंत्रणा सक्षम असल्याने त्यांना तिकिटेच्छुक असलेल्या सर्वांचेच कर्तृत्व पुरते ठाऊक आहे. त्यामुळे यंदा बदल होणारच, असे छातीठोकपणे सांगणारेही काहीजण आहेत. तेव्हा पालकमंत्र्यांच्या या संबंधीच्या ‘उक्ती’तून वेगळेच संकेत घेतले जात असताना, मुख्यमंत्र्यांकडून मात्र विद्यमानांनाच आपल्या रथावरून प्रचार साधण्यासाठी संधी देण्याची ‘कृती’ घडून आल्याने, नेमके काय असा प्रश्न गडद होऊन गेला आहे. यात जिल्ह्यातील चांदवड, कळवण, बागलाण आदी ठिकाणच्या इच्छुकांनाही समोर आणून त्यांच्यासाठीही जनादेश मागितला गेला असता तर ते सर्वव्यापी ठरले असते. पण, शहरातील विद्यमानांखेरीज ग्रामीणमधले इच्छुक तर केवळ मोदींच्या सभेसाठी गर्दी गोळा करण्यापुरतेच उरलेत. त्यामुळे त्याची म्हणून ‘रिअ‍ॅक्शन’ आगामी काळात आलेली दिसून येणे क्रमप्राप्त ठरावे.

Web Title: Who is the mandate to chase MLAs in chariots?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.