छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:36 IST2025-01-17T13:35:06+5:302025-01-17T13:36:47+5:30

राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.

What exactly is on Chhagan Bhujbals mind Wait and watch stand even after two months | छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय?; दोन महिन्यांनंतरही 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत

NCP Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाच नुकत्याच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही राष्ट्रवादीचे पहिले प्रदेशाध्यक्ष असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली असून भुजबळांकडून दोन महिन्यानंतरही 'वेट अँड वॉच'चीच भूमिका घेतली जात असल्याने त्याबाबत राष्ट्रवादीच्या वर्तुळात चर्चेला बहर आला आहे.

नागपूरमधील राजभवनात १५ डिसेंबरला भाजपसह शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकूण ३९ आमदारांनी शपथ घेतली होती. मात्र, त्यात भुजबळ यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्या दिवसापासूनच भुजबळ समर्थकांकडून रोष व्यक्त करण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर भुजबळ यांचे नाराजीनाट्य, समता परिषद मेळावा अशा घटना घडत गेल्या. तरीदेखील अजित पवार, प्रफल्ल पटेल किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भुजबळ यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर करण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे छगन भुजबळ आणि पक्षातील दरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बैठकीबरोबरच बुधवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांच्या आमदारभेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्याचा अर्थ भुजबळ 'वेट ॲन्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याची चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी भुजबळांशी फोनवरून चर्चा करण्यासह शिबिरात सहभागी होण्याची विनंती केली. मात्र, त्याला भुजबळांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या शनिवार आणि रविवारी होणाऱ्या पक्षाच्या शिबिरातही भुजबळ येणार की नाही ? याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. भुजबळ यांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता ते फार काळ स्वस्थ राहतील किंवा 'साईड ट्रॅक'ला जाण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे.


 

Web Title: What exactly is on Chhagan Bhujbals mind Wait and watch stand even after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.