टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:42 IST2023-07-23T13:41:42+5:302023-07-23T13:42:18+5:30
सदर घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टोलनाक्यावर मध्यरात्री नेमकं काय घडलं?; बाळा नांदगावकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. यावेळी नाशिकला असताना सिन्नर जवळ समृद्धी महामार्गावर अमित ठाकरे यांची कार टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला आहे. अमित ठाकरे या महामार्गावरून गेल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.
सदर घडलेल्या प्रकाराबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांच्या गाडीला फास्टॅग आहे. अमित ठाकरे यांची गाडी जेव्हा टोलनाक्यावर होती तेव्हा काही तांत्रिक अडचणींमुळे टोलनाक्यावरील खांब वर झाला नाही. त्यामुळे त्यांनी अमित ठाकरे यांना थांबवलं. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारलं असता कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना उद्धटपणे उत्तर दिली. तिथल्या कर्मचाऱ्यांनी उद्धट नको बोलायला हवं होतं. नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
नाशिकच्या सिन्नर येथे समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याची मनसेकडून तोडफोड @mnsadhikrut#AmitThakceraypic.twitter.com/EPRhAJU8LR
— Lokmat (@lokmat) July 23, 2023
अमित ठाकरे टोलनाक्यावरुन निघाल्यानंतर मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली. २-३ वाहनांमधून मनसे कार्यकर्ते टोलनाक्याला दाखल झाले होते. त्यांनी टोलनाक्याच्या केबिनमधील काचा फोडल्या आणि त्याठिकाणाहून निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अद्याप या घटनेत कुणीही तक्रार केली नाही. परंतु पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
मनसेने उभारले होते टोलनाक्यांविरोधात आंदोलन
काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांविरोधात आंदोलन उभारले होते. अनेक टोलनाक्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: उभे राहून वाहनांची नोंदणी केली होती. मुदत संपूनही अनेक टोलनाके राज्यात सुरू असल्याचे निदर्शनास येताच राज ठाकरेंच्या आदेशाने कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर राज्य सरकारने ६५ टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज ठाकरेंचे हे टोलनाका आंदोलन प्रचंड गाजले होते. त्यानंतर विरोधकांनी टोलनाक्याच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सेटलमेंट केली असा आरोप केला. आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. त्यात समृद्धी महामार्गावर टोलनाक्याची पहिल्यांदाच तोडफोड झाली आहे.