पाकिस्तानच्या भुत्तो कुटुंबियांचा इतिहास जागविते नाशिकमधील पुरातन बारव
By Azhar.sheikh | Updated: May 14, 2018 16:55 IST2018-05-14T16:53:47+5:302018-05-14T16:55:03+5:30
नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे.

पाकिस्तानच्या भुत्तो कुटुंबियांचा इतिहास जागविते नाशिकमधील पुरातन बारव
नाशिक : पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख व दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांचा थेट संबंध नाशिकशी फाळणीपुर्व आल्याच्या खाणाखुणा आहे. उच्चशिक्षित झुल्फिकार हे इंग्रज लष्करामध्ये नोकरीला होते. त्यावेळी ते नाशिकमध्ये देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे या लहानशा गावी भुत्तो यांच्या जमिनी होत्या. या गावाच्या मातीमध्ये भुत्तो कुटुंबियांचा इतिहास दडलेला आहे. गावातील जुनी बारव जी भुत्तो यांनी फाळणीच्या वेळी गावाला बक्षीस म्हणून दिली ती बारव इतिहास जागविते. गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे या ज्येष्ठांनाही त्यावेळीच्या आठवणी आजही लख्ख आठवतात.
नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे. झुल्फिकार भुत्तो यांचे वडील शाहनवाज भुत्तो हे गुजरात्या जुनागड संस्थानाचे दिवाण होते. त्यावेळी त्यांच्याकडे परंपरागत नाशिक भागातील काही जहागिऱ्या होत्या. इंदोरे गावातही त्यांची दहा ते पंधरा एकर जमीन होती, ती त्यांनी कुळांना कसण्यासाठी दिल्याचे आजही दरगोडे हे आत्मविश्वासाने सांगतात.
इंदोरे गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी (कब्रस्तान) नजरेस पडते. या दफनभूमीमधील काही दगडी कबरी झाडाझुडुपांमध्ये असल्याने लक्षात येत नाही. हे कब्रस्तान भुत्तो यांच्या खानदानाचे होते, असे दरगोडे व मोहम्मद हनिफ सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भुत्तो यांनी शेतसारा गोळा करण्यासाठी रानडे नावाच्या वकिलांची नियुक्ती त्याकाळात केली होती हेदेखील दरगोडे यांना चांगले आठवते. रानडे वकिलांशी त्यांचा चांगला परिचय त्यावेळी आला.
बारव दिली गावाला भेट
भारताच्या फाळणीनंतर भुत्तो हे पाकिस्तानात निघून गेले त्यावेळी त्यांनी त्यांच्या इंदोरे गावामधील कुळाच्या जमिनींना लागून असलेली मोठी जुनी बारव गावाला बक्षीस म्हणून दिली. या बारववर कोणाचाही हक्क नसून ती गावाची जुनी बारव म्हणून आजही ओळखली जाते. या बारवमुळे या गावाचे गावपण टिकून राहिले असे दरगोडे सांगतात. कारण दुष्काळ पडला तेव्हा या बारवमध्ये पाण्याची पातळी चांगल्याप्रकारे टिकून होती. यामुळे गावातील जेमतेम अडीचशे ते पाचशे लोकांची तहान या विहिरीने त्यावेळी भागविली. गावक-यांचे पशुधनही या विहिरीवर आपली तहान भागवत आंघोळ करत असे बारवमध्ये उत्तरण्यासाठी पाय-यांचा जीना ही बांधलेला होता. कालंतराने गावक-यांनी बारवमध्ये जाण्याची ही वाट बुझविल्याचे दरगोडे म्हणाले. त्यानंतर परिस्थिती बदलली गाव बागायती झाले. आजही बारवच्या तळाला पाण्याची पातळी टिकून आहे. जर त्यावेळी ही बारव इंदोरेवासियांना मिळाली नसती तर कदाचित मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले असते, असे दरगोडे म्हणाले.
गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे