शस्त्रसाठा जप्त प्रकरण : मुंबई येथून राज्याचे दहशतवादविरोधी पथक नाशिकमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:04 IST2017-12-16T16:55:10+5:302017-12-16T17:04:08+5:30
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला.

शस्त्रसाठा जप्त प्रकरण : मुंबई येथून राज्याचे दहशतवादविरोधी पथक नाशिकमध्ये दाखल
नाशिक : अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाचा हा तिघा साथीदारांच्या मदतीने शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जीपमधून घेऊन नाशिकमार्गे मुंबईत पोहचविण्याच्या तयारीत होता; मात्र नाशिकच्या सीमेवरच चांदवडमध्ये पोलिसांनी त्याचा कट उधळून लावला. मुंबईत घातपात घडविण्याची शक्यता असल्याची बाब पुढे आल्यानंतर मुंबई दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) नाशिकमध्ये दाखल झाले आहे.
दोन बोअर सिंगल बॅरल रायफल, १७ पिस्तूल, चार हजार १४२ जिवंत काडुतसे, दोन विदेशी गन, एक पंप अॅक्शन गन, पाइंट-२२ रायफल बारा, असा भला मोठा शस्त्रसाठा नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री जप्त केला. ही शस्त्रास्त्रे मुंबईमध्ये घातपात घडविण्याच्या दृष्टीने पोहचविली जात होती का? याबाबत पोलिसांनी कुठलाही खुलासा केला नाही; मात्र सदर शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर राज्यभरातील सर्व पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा, दहशतवादी विरोधी पथक ‘अॅक्शन’मध्ये आले आहे. मुंबईचा कुख्यात गुंड बादशाह ऊर्फ सुका पाचा, नागेश राजेंद्र बनसोडे, सलमान अमानुल्लाखान यांनी उत्तर प्रदेशमधील शस्त्रांचा साठा गुदामामधून लुटला आणि त्यानंतर नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने हे तिघे बोलेरो जीपमधून निघाले होते.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईनंतर अवघ्या राज्याची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यानंतर मुंबईचे दहशतवादविरोधी पथक, उत्तर प्रदेशमधील बांदा पोलीस नाशिकला दाखल झाले आहेत. एकूणच नाशिक ग्रामीण पोलिसांनी एटीएस, बांदा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे गतिमान केली आहे.