स्कूल चले हम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:44 IST2018-06-14T23:44:26+5:302018-06-14T23:44:26+5:30

स्कूल चले हम...
सायखेडा : एक महिन्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा शुक्रवारी (दि. १५) सुरू होत असल्याने नवीन शालेय वर्षाची सुरुवात करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक संबंधित सर्व घटक सज्ज झाले आहेत.
शिक्षण विभाग शाळेचा पहिला दिवस विविध प्रकारच्या उपक्र मांनी साजरा करीत आहे. मशाल फेरी काढून पालकांमध्ये जनजागृती करणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणे, दखलपात्र विद्यार्थी शोधणे, वर्ग सजावट करून आनंदोत्सव साजरा करणे, शालेय पुस्तकांचे वाटप करणे, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ तयार करून जेवण देणे, प्रभातफेरी काढणे अशा विविध उपक्रमांनी पहिला दिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या उपक्र मात परिसरातील जिल्हा परिषद, पंचायत सदस्य, सरपंच, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.मुलांना गुलाबपुष्प, मिठाईचे करणार वाटप शालेय शिक्षण प्रवाहात येणारा विद्यार्थी आपले कुटुंब सोडून एका वेगळ्या विश्वात येत असतो. तो त्या ठिकाणी रमला पाहिजे. त्यासाठी दोन दिवसांपासून शालेय इमारत, शालेय आवाराची साफसफाई करण्यात आली आहे. आज त्याचे गुलाबपुष्प, मिठाई देऊन स्वागत करण्यात येणार आहे.
शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आठवण निर्माण करणारा असतो, त्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी सुरू असून, पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, दाखला काढणे, शाळा निवडणे, वाहतुकीची सुविधा उपलब्ध करणे यासाठी एकच धावपळ उडाली आहे. अनेक पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने आठवडाभर मजुरीचे काम करून चार पैसे साचवून त्यांनी आपल्या पाल्याची शालेय तयारी केली आहे.