सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:31 IST2019-05-09T00:30:54+5:302019-05-09T00:31:17+5:30
सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.

सटाण्यात पाणीप्रश्नावरून रंगला कलगीतुरा
सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केला आहे.
माजी आमदार संजय चव्हाण यांनी राजीनामा मागीतल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष मोरे यांनी त्यांना आव्हान दिले असून, पाणी योजना पूर्णत्वास न गेल्यास आपण एकही निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करून तुम्हीही अशी हिम्मत दाखवाल का? असे थेट आव्हान चव्हाण यांना दिले आहे.
शहरातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यास प्रत्युत्तरादाखल नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी चव्हाण यांना थेट पत्र लिहिले असून, ते प्रसिद्धीसही दिले आहे. माझा राजीनामा मागण्याची नैतिकता तुमच्याकडेही नाही. पाण्यासाठी शहर आणि तालुक्यातील जनतेने आपल्याला एकदा नाही, तर दोनदा आमदारकी दिली आहे, असे नगराध्यक्ष मोरे यांनी पत्रात म्हटले असून त्यांनी पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जनतेने मुदतपूर्व राजीनामा मागितला तरी तो तत्काळ देण्याची माझी तयारी आहे; पण आपण मात्र एवढी वर्र्षं सत्ता उपभोगूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकला नाहीत म्हणून राजीनामा देणार का? असे खुले आव्हान नगराध्यक्षांकडून पत्राव्दारे देण्यात आले आहे.