भरपावसातही पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:38 IST2018-07-25T00:38:05+5:302018-07-25T00:38:21+5:30
प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

भरपावसातही पाणीटंचाई
इंदिरानगर : प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे इंदिरानगरवासीयांना भर पावसात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागात निवेदन, आंदोलने व घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
गजानन महाराज रस्त्यालगत असलेल्या विविध सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर-एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरायला पाणी आणायचे कोठून? असा प्रश्न परिसरातील महिला वर्गांना भेडसावत आहे.
अभियंत्यांना घेराव
गेल्या वर्षापासून प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे परिसरातील महिलावर्गही त्रस्त झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलने आणि घेराव घालूनसुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच प्रभागाचे नगरसेवक अॅड. श्याम बडोदे आणि प्रभागाच्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतांना घेराव घातला होता. तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही.