अनर्थ टळला : इंदिरानगर, वडाळागावात प्लॅस्टिक भंगार वस्तूंना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 16:34 IST2019-03-23T16:29:45+5:302019-03-23T16:34:04+5:30
भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला.

अनर्थ टळला : इंदिरानगर, वडाळागावात प्लॅस्टिक भंगार वस्तूंना आग
नाशिक : परिसरातील श्रद्धाविहार कॉलनीजवळ असलेल्या नाल्याला लागून असलेल्या भूखंडावर अज्ञात गॅरेजचालकांनी भंगार मालाचा कचरा बेवारस स्थितीत रात्रीच्या सुमारास फेकला. या कचऱ्याने दुपारीस साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. प्लॅस्टिकचे मोठे तुकडे असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उठल्याने परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन उपकेंद्राचे जवान बंंबासह घटनास्थळी दाखल झाले.
रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने भंगार छाननी करण्याच्या उद्देशाने प्लॅस्टिकचा भंगार पेटविल्याचे बोलले जात आहे. यामुळे भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. घटनास्थळ सैन्याच्या छावणीच्या संरक्षक कुंपणाजवळ असल्यामुळे टेहळणीवर असलेल्या जवानांनी धोका लक्षात घेत पाणी फेकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग विझली नाही. यावेळी नागरिकांनी परिसरातील नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. बडोदे यांनी तत्काळ अग्निशमन मुख्यालयाशी संपर्क साधत मदत मागितली. अवघ्या काही मिनिटांत सिडको उपकेंद्राचा बंब घेऊन जवान घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करत जवानांनी आग पंधरा ते वीस मिनिटांत आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.
वडाळ्यातही कचऱ्याने घेतला पेट
वडाळागावातील श्रीश्री रविशंकर मार्गावरील तैबानगरजवळ असलेल्या एका पडीक बांधकामाच्या जागेत असलेला प्लॅस्टिक कचºयाचा ढीग अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने मोठी आग लागली होती. प्लॅस्टिक भंगार वस्तूंचा कचरा पेटल्यामुळे काळाकुट्ट धूर आकाशात दिसत होता. तसेच आगीच्या ज्वालाही धगधगत होत्या. पडीक बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक भिंत असल्यामुळे आग पसरली नाही. या पडीक बांधकामाला लागून नागरिकांची घरे आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आगीवर पाणी टाकून आग विझविली. या पडीक जागेत परिसरातील गॅरेजधारक, भंगार मालाचा व्यवसाय करणारे व्यावसायिक कचरा आणून टाकत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. महापालिकेने उघड्यावर कचरा, तसेच टाकाऊ साहित्य फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.