हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 18:22 IST2019-03-09T18:21:51+5:302019-03-09T18:22:11+5:30
जऊळके नेऊर : पालखेडच्या आवर्तनाकडे लक्ष

हंडाभर पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा
जळगाव नेऊर : ग्रामीण भागात विहिरी, कूपनलिका, बोअरवेल यासारखे जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तासनतास उभे राहून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
तालुक्यात अनेक गावांत ३८ गाव नळपाणी पुरवठा योजना सुरळीत चालू आहे पण अनेक गावे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या गावातील बंधारे,नदी, नाले, ओढे वाहिले तर या गावातील पाणी पुरवठा योजना ठराविक दिवसांपर्यंत चालतात. पण उन्हाळ्यात या गावांना टॅँकरने पाणीपुरवठा किंवा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातून तलाव, बंधारे भरु न घ्यावे लागतात. यावर्षी मात्र पावसाचे जमिनीतून पाणीच न निघाल्याने गावाबरोबर वाडी-वस्त्याही पाण्याने व्याकुळ झालेल्या आहे. आता पालखेड डावा कालव्याच्या येणाऱ्या आवर्तनातून येथील बंधारे भरु न दिल्यास या गावातील पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. पश्चिम भागातील जऊळके येथील बंधारा पावसाळ्यात पालखेड डावा कालव्याच्या ओव्हर फ्लो आवर्तनातुन भरला होता. त्यावर चार पाच महिने बोअरवेलवर पाणीपुरवठा झाला,पण दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालल्याने बोअरवेलच्या थोड्या फार प्रमाणात येणाऱ्या पाण्यावर महिलांना तासनतास उभे राहून हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पाणी प्रश्न सुटण्यास मदत
गेली तीन वर्षे गावातील पाणीपुरवठा सुरळीत होता. गावातील बंधारा पालखेड डावा कालव्याच्या आवर्तनातुन आरक्षित केल्याने दरवर्षी बंधारा भरला जातो. पाण्याची पातळी खालावत चालल्याने थोड्याफार प्रमाणात येणा-या पाण्यावर गावाची तहान भागवावी लागत आहे, पालखेड डावा कालव्याच्या येणा-या आवर्तनातून आरक्षित बंधारा भरणार असल्याने पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
- भाऊराव जाधव , ग्रामपंचायत सदस्य,जऊळके