आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 01:07 IST2021-06-17T01:05:06+5:302021-06-17T01:07:08+5:30
राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण सेतू अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचायला जुलै उजाडणार असल्याने तोपर्यंत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची प्रतिक्षा
नाशिक : राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार नाही. शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय असला तरी आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांना मात्र तो पर्यायही अवलंबिणे कठीण असल्याने आदिवासी विकास विभागाने शिक्षण सेतू अभियान सुरू केले आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचायला जुलै उजाडणार असल्याने तोपर्यंत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अभियानांतर्गत गावागावात पालक समित्या स्थापन करून आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यभरात सुमारे ९९५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळास्तरावरील समिती प्रत्यक्ष गावपाड्यावर जाऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहे. प्रकल्प स्तरावरील समिती नियोजनाचे काम करणार आहे, तर आयुक्त स्तरावरील समिती अंमलबजावणीबाबतचे काम पाहणार आहे. आदिवासी भागात अनेक पालकांकडे मोबाइल फाेन नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांना कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षण प्रवाहातून बाहेर जाऊ नये यासाठी शिक्षण सेतू अभियानांतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविणार आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने आदिवासी विभागाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शैक्षणिक कामकाज सुरू केले असले तरी जेथे शक्य आहे त्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. दुर्गम, आदिवासी भागातील विद्यर्थ्यांना मात्र शैक्षणिक साहित्य मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. अद्याप शैक्षणिक साहित्याची छपाईच झालेली नसल्याने ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान जुलै महिना उजाडेल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चौकट-
राज्यातील शाळा आणि स्थापन समित्या
शिक्षण सेतू अभियानांतर्गत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित, एकलव्य आश्रमशाळांमध्ये अंमलबजावणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक विभागात एकूण ४८७ शाळा असून, ४३५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ठाणे विभागात २३३ शाळा आणि २०१ समित्या, नागपूर विभागात २६३ शाळा असून, २३० तर अमरावती विभागात २०४ शाळांसाठी १२८ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.