कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनलेले वडाळागाव अखेर ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:48 IST2020-06-01T21:46:21+5:302020-06-01T21:48:44+5:30

वडाळागावातील गावठाणमध्येही कोरोनाबाधित रुग्ण झीनतनगर भागात रविवारी आढळून आला. वडाळ्यातील शंभरफुटी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सादिकनगर, महेबुबनगर, मुमताजनगर, साठेनगर या भागात मोठ्या संख्येने रुग्ण मिळून आले आहेत.

Wadalagaon, which became a corona 'hotspot', finally 'sealed' | कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनलेले वडाळागाव अखेर ‘सील’

कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनलेले वडाळागाव अखेर ‘सील’

ठळक मुद्देप्रशासन सतर्क, नागरिक बेफीकिर बारा दिवसांत वडाळ्यात आढळले २९ रूग्ण

नाशिक : वडाळागाव परिसरात १९ मे रोजी पहिला कोरोनाग्रस्त ट्रकचालक रुग्ण आढळून आला होता. यानंतर सातत्याने वडाळागावात कोरोनाबाधित रुग्ण मिळून येऊ लागले. या बारा दिवसांत वडाळागावाचा कोरोनाग्रस्तांचा आकडा २९ वर पोहचला आहे. यामध्ये सुरूवातीला आढळून आलेले काही रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहे. वडाळागावात येणारे सर्व प्रमुख रस्ते आता महापालिका व पोलीस प्रशासनाने सोमवारी (दि.१) संध्याकाळी बॅरिकेड लावून बंद केले.
वडाळागावातील गावठाणमध्येही कोरोनाबाधित रुग्ण झीनतनगर भागात रविवारी आढळून आला. वडाळ्यातील शंभरफुटी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सादिकनगर, महेबुबनगर, मुमताजनगर, साठेनगर या भागात मोठ्या संख्येने रुग्ण मिळून आले आहेत. मुमताजनगरमध्ये ८ तर महेबुबनगरमध्ये ९ रुग्ण अद्याप मिळून आले आहेत. वडाळागावातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी दुसरीकडे लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली गेल्याने लोकांची रेलचेल अधिक वाढलेली दिसून येत आहे. सुरूवातीपासून वडाळागावात मनपा व पोलीस प्रशासनाकडून अधिकाधिक लक्ष देण्याची गरज होती. अत्यंत दाट लोकवस्ती, शिक्षणाचा अभाव असलेला मजुर, कामगार वर्ग आणि झोपडपट्टीचा भाग अशा या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१मध्ये समाविष्ट होणाऱ्या वडाळागावाची लोकसंख्याही प्रचंड आहे.
वडाळागावात १९ मेपासून कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली आणि हळुहळु वडाळा हे शहराचे ‘हॉटस्पॉट’ बनू लागले, यामुळे मनपा प्रशासनाचीही झोप उडाली. वडाळागावात प्रवेश करतानाच मुख्य चौफुलीवरील व्हिनस सोसायटीत एकूण ७ रुग्ण एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. वडाळागावातील रजा चौक, झीनतनगर या गावठाण भागासह वरील झोपडपट्टी भागातील नगरांच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढती आहे. कोरोनाचा आजार या भागात अधिक फैलावू नये, आणि संपुर्ण वडाळागावाला आपल्या कवेत घेऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने वडाळ्यात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. वडाळागावात तातडीने सर्वेक्षण मोहीम युध्दपातळीवर राबवून तपासणी अभियान राबविण्याची गरज आहे.


असा तोडला वडाळ्याचा ‘संपर्क’
वडाळागावातील वडाळा चौफुली येथील महारूद्र हनुमान मंदीरासमोरून मुख्य रस्ता बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. तसेच संत सावता माळी कॅनॉल रस्त्याला जोडणारे गणेशनगर, जय मल्हार कॉलन्यांचे उपरस्तेही बंद करण्यात येत आहे. तैबानगर व मदिनानगर या भागाला जोडणारे शंभर फुटी रस्त्यावरील उपरस्तेही नागरिकांनी बंद केले आहेत. इंदिरानगरकडून वडाळ्यात येणाºया श्री.श्री.रविशंकर रस्त्यावरदेखील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बॅरिकेड लावण्यात येऊन एकेरी करण्यात आला आहे. सादिकनगर, मुमताजनगर, महेबुबनगरकडे जाणारे रस्तेही बंद केले गेले आहेत. या सर्व नगरांमध्ये जाण्यासाठी शंभरफुटी रस्ता ओलांडावा लागतो.

Web Title: Wadalagaon, which became a corona 'hotspot', finally 'sealed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.