वडाळागावात सराईत गुन्हेगारांची दहशत ; कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:53 IST2018-12-18T00:52:54+5:302018-12-18T00:53:11+5:30
वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

वडाळागावात सराईत गुन्हेगारांची दहशत ; कारवाई करण्याची मागणी
इंदिरानगर : वडाळागावात सराईत गुन्हेगारांनी दहशत निर्माण केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ वडाळा गावातील खंडोबा चौकात दोन सराईत गुन्हेगारांनी एका युवकास चॉपर व लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती़ त्यानंतर सल्ली पॉईंट येथे विटांचा पुरवठा करणाऱ्या एकास चार ते पाच संशयितांनी बेदम मारहाण करून तलवारीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची खंडणी मागीतली होती़ या घटना ताज्या असतानाच दोन दिवसापूर्वी सराईत गुन्हेगारांनी मेहबूबनगरमध्ये घरात घुसून एका कुटुंबातील सदस्यांना लोखंडी
रॉडने मारहाण करून त्यापैकी एकास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता़
वडाळागाव परिसरात सराईत गुन्हेगार दहशत माजविण्यासाठी एकामागून एक गुन्हे करीत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ पोलिसांनी या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ सराईत गुन्हेगारावर तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असता त्याने तो रद्द करून आणल्याची माहिती असून यामुळे परिसरात गुन्हेगारी वाढली आहे़ दरम्यान, गावातील पोलीस चौकीस सक्षम अधिकाºयाची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़