वडाळा जॉगिंग ट्रॅकलगत वाहतेय गटार; फेरफटका मारताना दुर्गंधीचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 15:55 IST2018-10-08T15:53:50+5:302018-10-08T15:55:42+5:30

वडाळा जॉगिंग ट्रॅकलगत वाहतेय गटार; फेरफटका मारताना दुर्गंधीचा सामना
नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेजारून भूमिगत गटारीचे चेंबर तुडूंब भरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. जॉगिंग ट्रॅक संकल्पना खरी तर निरामय सुदृढ आरोग्यासाठी विकसीत करण्यात आली आहे. शहरातील जॉगिंग ट्रॅक या संकल्पनेनुसार विकसीत करण्यात आले देखील आहे; मात्र वडाळागावाचा जॉगिंग ट्रॅक याबाबत अपवाद ठरतो. या जॉगिंगट्रॅकवरुन फेरफटका मारणे म्हणजे निरोगी शरीर रोगी करुन घेण्यासारखे असेच आहे. कारण जॉगिंग ट्रॅकला आलेला बकालपणा, वाढलेले गाजरगवत, ठिकठिकाणी पडलेला कचरा, वाहणारी गटारगंगा, खड्डे, बाकांचा अभाव, पथदीपांची असुविधा, व्यायाम साहित्याची कमतरता, संरक्षक कुंपणाची तटबंदी नाही, अशा एक ना अनेक समस्यांनी या जॉगिंगट्रॅकला ग्रासले आहे. केवळ एक ते दीड किलोमीटरचा हा ट्रॅक विकसीत करण्याबाबत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधीदेखील तितकेच उदासिन आहे. या जॉगिंगट्रॅकचा वापर भाजी बाजार, वाहनतळासाठीदेखील केला जाऊ लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वडाळागाव हे इंदिरानगर-डीजीपीनगर क्रमांक १ च्या मध्यभागी असून या गावापासून उजव्या क ालव्यावर दोन्ही बाजूंनी जॉगिंग ट्रॅक आहेत; मात्र इंदिरानगर व डीजीपीनगर विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे सुसज्ज अद्ययावत ट्रॅक पहावयास मिळतात. वडाळागावाच्या नागरिकांना मात्र ट्रॅकच्या सुविधेपासून वर्षानुवर्षांपासून वंचित रहावे लागत आहे. वडाळागावातील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिकांकडून वडाळा चौफूली ते साईनाथनगरपर्यंतच्या ट्रॅकला अधिक प्राधान्य दिले जाते; मात्र या ट्रॅकची दुर्दशा बघून नागरिकांना नाईलाजास्तव पाठ फिरवावी लागत आहे. कालव्याच्या जागेत वृक्षराजी चांगली बहरली असून गरज आहे, ती जॉगिंगट्रॅकच्या विकासाची. चार वर्षांपुर्वी मुरूम टाकून वृक्षराजीच्या मध्यभागातून केवळ रस्ता तयार करून महापालिकेने जबाबदारी पुर्ण केल्याचा आव आणला आणि हात झटकले.