वडाळा-डीजीपीनगर : कार दुभाजकावर आदळली; तीघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:23 IST2019-01-03T16:21:16+5:302019-01-03T16:23:15+5:30
डीजीपीनगरकडे जाताना रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला चारचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. दर पंधरवड्यात एक किंवा दोन अपघात अशाच पद्धतीने याच ठिकाणी होत

वडाळा-डीजीपीनगर : कार दुभाजकावर आदळली; तीघे गंभीर जखमी
नाशिक : वडाळा-डीजीपीनगरमार्गे मुंबई, पुणे महामार्गांना जोडणाऱ्या संत सावता माळी रस्त्यावरील वाढीव दुभाजकावर बुधवारी (दि.२) संध्याकाळी टाटा इंडिगो मोटार (एम.एच.०४, ईएफ ३८९०) आदळून अपघात घडला. या दुभाजकाची लांबी-रुंदी प्रमाणापेक्षा अधिक असून, त्यामुळे वाहनचालकांना या दुभाजकाचा अंदाज येत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळा-डीजीपीनगर रस्त्यावर सातत्याने रविशंकर मार्गाच्या चौफुलीजवळ डीजीपीनगरकडे जाताना रस्त्यावर असलेल्या दुभाजकाला चारचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. दर पंधरवड्यात एक किंवा दोन अपघात अशाच पद्धतीने याच ठिकाणी होत असल्याने हा दुभाजक अपघाताचा केंद्रबिंदू ठरत आहे. जीवघेण्या ठरणाºया दुभाजकाची लांबी कमी करून दुभाजकापुढे पांढरा पट्टा मारावा व रिफ्लेक्टर बसवावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र या समस्येकडे महापालिका प्रशासन किंवा शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संध्याकाळच्या सुमारास दुभाजकाला धडकलेल्या टाटा इंडिगो मोटारीमधील चालकासह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. इंदिरानगरकडून वडाळा चौफुली ओलांडल्यानंतर डीजीपीनगरकडे जाणा-या वाहनांचा वेग वाढतो. येथील विठ्ठल मंदिराजवळ या रस्त्याला तीव्र वळण आहे. या वळणावरून वाहने भरधाव वेगाने पुढे जातात. दरम्यान, रात्रीच्या वेळी वळणावर तसेच रस्त्यावरील दुभाजकावर वाहने जाऊन आदळतात. संध्याकाळच्या सुमारास अशाच पद्धतीने कार दुभाजकावर जाऊन आदळली. मोटारचालक अपघातात जखमी झाला आहे. महिनाभरापूर्वीदेखील एका मोटारीला असाच अपघात येथे झाला होता. या मोटारीमधून प्रवास करणारे कुटुंब अपघातातून बालंबाल बचावले होते. रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्यामुळे अपघातसमयी मदतदेखील तत्काळ मिळणे कठीण होते.