Violence against minor girl in Makhlamabad | मखमलाबादला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मखमलाबादला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देनराधमास अटक : पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी

नाशिक : तुला मैत्रिणीने बोलावले... असे सांगत संशयित नराधमाने एका १३ वर्षीय मुलीला मखमलाबाद येथील शांतीनगरमध्ये स्वत:च्या घरात घेऊन जात तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित बाजीराव सांगळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शहरात आठवडाभरानंतर ही दुसरी घटना घडली आहे. हैदराबाद, उन्नाव येथील महिला अत्याचाराच्या घटनांनी देश हादरला असताना शहरातदेखील अशाच घटना घडत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच एका बालिकेवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित नराधम पीडितेकडे गेला आणि त्याने ‘तुला मैत्रिणीने बोलाविले’ असे सांगून स्वत:च्या घरी घेऊन गेला. तेथे पीडित मुलीसोबत शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली असता पीडितेने त्यास रोखत प्रतिकार केला, मात्र संशयिताने ‘तू जर ओरडली तर तुला ठार मारून टाकेन’ अशी धमकी दिली.
या घटनेनंतर पीडित मुलीने आपले घर गाठून मोठ्या धाडसाने पालकांना घडलेला प्रकार कथन केला. पीडितेच्या आईने म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुलीसह धाव घेऊन संशयिताविरुद्ध फिर्याद दिली. म्हसरूळ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ संशयित सांगळेविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार (पोक्सो) गुन्हा नोंदविला. सांगळे हा विवाहित असून, तो काही महिन्यांपासून घरात एकटाच राहत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. रविवारी संशयित सांगळे यास बेड्या ठोकून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहेत.

Web Title: Violence against minor girl in Makhlamabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.