गावोगावी रंगू लागले कुस्त्याचे फड
By Admin | Updated: May 9, 2015 23:14 IST2015-05-09T23:08:58+5:302015-05-09T23:14:40+5:30
लाल मातीवरील कुस्त्या अजूनही टिकून

गावोगावी रंगू लागले कुस्त्याचे फड
घोटी : मराठी वर्षाचा पहिलाच महिना म्हटले की, सर्वत्र स्थानिक यात्रोत्सवाची लगबग सुरू असते. या यात्रोत्सवातून काळाच्या बदलानुसार ग्रामीण ढंगातील हजेरीवरील तमाशे पडद्याआड गेले असले तरी लोकांच्या मनोरंजनाची जागा पारंपरिक भारूड, व मोठ्या बजेटच्या तमाशानी घेतली आहे.
ग्रामीण भागातही यात्रा उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या बजेटचे तमाशा आणण्यास प्राधान्य दिले जात आहे, तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक गावात कुस्त्याचे सामने भरविण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील लाल माती कुस्त्याच्या आखाड्याने रंगू लागले आहेत.
साधारणत: चार ते पाच दशकापूर्वी गाव तेथे मंदिर आणि मंदिर तेथे व्यायामशाळा असायची. यामुळे आपला मुलगा पहिलवान असावा असे प्रत्येक मुलाच्या वडिलांना वाटत असे. यासाठी मुलाला पौष्टिक खाऊ घालण्याबरोबर तो नियमित व्यायाम करतो की नाही यावर पालकाचे बारीक लक्ष असे.
गावातील एखादा तरुण नामवंत पहिलवान झाला तर त्याच्या कुस्त्या पाहण्यासाठी संपूर्ण गाव कुस्तीच्या ठिकाणी हजर राहून त्याला प्रोत्साहन देत असे. यामुळे यात्रेनंतर कुस्ती सामन्याची परंपरा की कायम टिकून होती.
परंतु या कुस्त्याच्या जोडीला बैलाच्या शर्यती होऊ लागल्या.
परंतु या शर्यतीला न्यायालयाने
बंदी आणल्यानंतर पुन्हा एकदा कुस्त्याचे सामने भरविण्यावर
भर दिला जात आहे. यामुळे
ग्रामीण भागात पुन्हा एकदा
कुस्त्याचे सामने रंगू लागले
आहेत. (वार्ताहर)