Vidhan Sabha 2019: हिरे घराण्याची उद्ध्वस्त राजकीय माडी; भाऊबंदकीची दाभाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 05:22 PM2019-10-01T17:22:12+5:302019-10-01T17:23:43+5:30

चौथी पिढी नाशिक पश्चिमच्या आश्रयाला

Vidhan Sabha 2019: Article on Nashik west assembly politics in Hire family | Vidhan Sabha 2019: हिरे घराण्याची उद्ध्वस्त राजकीय माडी; भाऊबंदकीची दाभाडी

Vidhan Sabha 2019: हिरे घराण्याची उद्ध्वस्त राजकीय माडी; भाऊबंदकीची दाभाडी

Next

धनंजय वाखारे

नाशिक : जिल्ह्यातील राजकारणात एकेकाळी हिरे कुटुंबीयांचा मोठा दबदबा होता. दाभाडी मतदारसंघावर बव्हंशी काळ या कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. 1980 च्या निवडणुकीपासून मात्र या कुटुंबीयात भाऊबंदकीचे नाटय़ सुरू झाले आणि चढाओढीच्या राजकारणात हिरे कुटुंबीय दाभाडीतून हद्दपार होण्यास प्रारंभ झाला. दरवेळी दाभाडीतून लढणा-या हिरेंना 2014 मध्ये लगतच्या नांदगाव मतदारसंघाचा आश्रय घ्यावा लागला होता. आता हिरे कुटुंबीयातील चौथ्या पिढीतील सदस्यांना दाभाडी सोडून नाशिक शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघ सुरक्षित वाटू लागला असला तरी या मतदारसंघात भाजपने पसरलेले हातपाय पाहता हिरे चमकतील की नाही, याबाबत साशंकताच आहे.

लोकल सेल्फ गर्व्हंमेंटपासून ते राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलखाते सांभाळणारे भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर 1962 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून कॉँग्रेसकडून व्यंकटराव भाऊसाहेब हिरे यांनी विजय संपादन केला. 1967 मध्ये दाभाडी मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर याठिकाणी व्यंकटराव हिरे निवडून गेले आणि त्यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविले. पुढे 1972च्या निवडणुकीत व्यंकटराव हिरे यांचे चुलतबंधू बळीराम हिरे यांनी कॉँग्रेसकडून उमेदवारी करत दाभाडी राखली. 1978च्या निवडणुकीतही बळीराम हिरे यांनी पुन्हा एकदा विजय मिळविला.

1980 मध्ये कॉँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बळीराम हिरे  इंदिरा कॉँग्रेसकडून तर व्यंकटराव हिरे कॉँग्रेस (यू) कडून उमेदवारी करत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. येथूनच राजकीय भाऊबंदकीला सुरुवात झाली. या निवडणुकीत बळीराम हिरे यांनी व्यंकटरावांवर मात केली. बळीराम हिरे यांनी मंत्रिपदही भूषविले. 1985च्या निवडणुकीत व्यंकटराव यांच्या पत्नी पुष्पाताई आणि बळीराम यांच्या पत्नी इंदिराबाई या समोरासमोर उभ्या ठाकल्या. त्यात एस कॉँग्रेसकडून उमेदवारी करणा-या पुष्पाताई विजयी झाल्या. 1990 मध्येही पुष्पाताईंनी दाभाडी राखली. 1995 च्या निवडणुकीत पुष्पाताई यांना बळीराम हिरे यांनी आव्हान दिले. परंतु, मतदारांनी पुष्पाताईंना पसंती देत विधानसभेत तिस:यांदा पाठविले. यावेळी बळीराम हिरे यांचा अवघ्या 2500 मतांच्या आसपास पराभव झाला होता. 

पुष्पाताई हिरे यांनीही मंत्रिमंडळात आरोग्य खात्याचा कारभार सांभाळला होता. 1999च्या निवडणुकीत पुष्पाताईंचे सुपुत्र प्रशांत हिरे यांनाही विधानसभेचे वेध लागले आणि त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत आपले चुलतकाका बळीराम हिरे यांचा पराभव केला. प्रशांत हिरे यांनीही राज्यमंत्रिपद भूषविले. 2004च्या निवडणुकीत प्रशांत हिरे यांनी राष्ट्रवादीकडून, तर त्यांचे चुलतबंधू प्रसाद बळीराम हिरे यांनी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र, नवख्या अपक्ष दादा भुसे यांनी हिरे बंधूंना पराभव दाखविला. 2009मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दाभाडीऐवजी मालेगाव बाह्य मतदारसंघ उदयास आला. त्यावेळी, शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून प्रशांत हिरे असा सामना झाला. परंतु, भुसे यांनी याहीवेळेस हिरे यांना राजकारणात डोके वर काढू दिले नाही.

2014च्या निवडणुकीत हिरे कुटुंबीयातील चौथी पिढी रिंगणात उतरली. दाभाडी मतदारसंघातील अवघड गणिते पाहता हिरे कुटुंबीयातील अद्वय प्रशांत हिरे यांनी लगतच्या नांदगाव मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली. परंतु, त्यांना पंकज भुजबळ यांच्याकडून पराभव पाहावा लागला. अद्वय हिरे तिस-या क्रमांकावर राहिले. दरम्यान, हिरे कुटुंबीयांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली.

आता हिरे कुटुंबीयातील सदस्य आणि माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनाही दाभाडी असुरक्षित वाटू लागल्याने त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघाची निवड केली आहे. राष्ट्रवादीकडून ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघ हा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडूनही अनेक जण इच्छुक असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, माकपचेही या मतदारसंघात थोडेफार प्राबल्य आहे. त्यामुळे मतविभागणी मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दाभाडीतील हिरे हे नाशिक पश्चिममध्ये कितपत चमकतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019: Article on Nashik west assembly politics in Hire family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.