शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

By Admin | Updated: May 17, 2014 00:19 IST2014-05-17T00:01:43+5:302014-05-17T00:19:12+5:30

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा

Victory rally in Shiv Sena office | शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा
नाशिक : नाशिक लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्यानंतर शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात शिवसैनिकांचा विजयी मेळावा जल्लोषात पार पडला. येत्या दोन-चार दिवसांत शहरात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित झाल्यानंतर शालिमार चौकातील शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. मात्र विजयी मिरवणुकीला बंदी घालण्यात आल्याने चौकातच फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करीत शिवसैनिकांनी जल्लोष करून परिसर दणाणून सोडला.
शिवसेना कार्यालयाच्या सभागृहात शिवसैनिकांचा विजयी मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार बबन घोलप हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठवित म्हणाले, येत्या विधानसभेतही भुजबळांना पराभवालाच सामोरे जावे लागेल. त्यांनी जी पापे केली त्याचा हा परिणाम आहे. देवळालीतून त्यांना मते तर मिळणार नव्हती तर सिन्नरकरांना दुखावलेले होते. त्यांना शिवसेनेने आपलेसे केले. भुजबळ लोकांच्या नजरेतून उतरले होते म्हणूनच त्यांचा पराभव झाला, असेही घोलप म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख यांनीही भुजबळांवर तोंडसुख घेत शिवसेनेचा विजय हा तमाम शिवसैनिकांचा असून, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे हे फळ असल्याचे म्हटले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर शिवाजी सहाणे, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, दत्ता गायकवाड, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पवन क्षीरसागर आदि उपस्थित होते. मेळाव्यानंतर हेमंत गोडसे यांच्या नावाने जयघोष करण्यात आला.

Web Title: Victory rally in Shiv Sena office