Various religious programs today to celebrate Kartikis | कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम
कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये कोजागरी पौर्णिमेप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेलाही महत्त्व असते. या दिवशी स्नान करून भगवान कार्तिकेच्या दर्शनाला अत्यंत महत्त्व असल्याचे मानले जाते. वर्षभर महिलांना दर्शन न दिले जाणाऱ्या भगवान कार्तिकेच्या मंदिरात एक दिवसासाठी महिलांना दर्शन खुले असते. कार्तिक मासात येणाºया पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी हा सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून, त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते, तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशीदेखील श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकाराहून अधिक मोठा दिसतो. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो.  त्यामुळे या दिवशी चंद्राचे दर्शन अधिक शुभ आणि मन प्रसन्न करणारे असल्याचे मानले जाते.
त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत: कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी श्रद्धा आहे. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी शंकराची नावे घेऊन आणि विष्णूचे सहस्रनाम घेऊन बेल आणि तूळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते. म्हणून त्यावेळी बेल व तूळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.
दीपोत्सव सोहळा
कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील अन्य सर्व मंदिरे अशा तºहेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा प्रकाशमान होऊन झळाळतात. महादेव मंदिरांमध्ये भाविक दीप लावून उत्सव साजरा करतात.

 

Web Title:  Various religious programs today to celebrate Kartikis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.