Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:07 IST2025-12-25T13:04:27+5:302025-12-25T13:07:19+5:30
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.

Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिक मध्ये मोठे राजकीय घमासान सुरू झाले असून उद्धवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे आणि यतीन वाघ आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत, जो महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपच्या वाटेवर असल्याची कुणकुण लागताच त्यांची उद्धवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही नेत्यांच्या हकालपट्टीची माहिती दिली.
पक्ष विरोधी कारवायां बद्दल
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 25, 2025
नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे!
जय महाराष्ट्र!
"पक्षविरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र!", अशी संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
शिवसेनेसह काँग्रेसलाही गळती
आज होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे भाजपने एकाच वेळी शिवसेना उबाठा आणि काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. विनायक पांडे हे उद्धव सेनेचा आक्रमक चेहरा आणि माजी महापौर होते. तर, यतीन वाघ यांची उद्धव सेनेतील प्रभावी नेते म्हणून ओळख होती. केवळ उद्धवसेनेलाच नाही, तर काँग्रेससाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या खैरे घराण्यातील शाहू खैरे यांनी भाजपची वाट धरल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
नाशकात भाजपची ताकद वाढणार
नाशिक महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. पांडे, वाघ आणि खैरे यांच्याकडे दांडगा जनसंपर्क आणि स्वतःचे हक्काचे वॉर्ड आहेत. या नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भाजपची ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.