शहरातून कारसह दोन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:11 IST2018-09-19T00:11:30+5:302018-09-19T00:11:46+5:30
शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, चोरट्यांनी मारुती कारसह दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत़

शहरातून कारसह दोन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून, चोरट्यांनी मारुती कारसह दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत़ त्र्यंबक रोडवरील पटेल कॉलनीतील धनश्री अपार्टमेंटमधील रहिवासी मंगेश खडांगळे यांची चाळीस हजार रुपये किमतीची मारुती-८०० कार (एमएच ०२ जे ७२८६) चोरट्यांनी १४ व १५ सप्टेंबर या कालावधीत येथील ओक बंगल्याच्या मागून चोरून नेली़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ निफाड तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी संजय सांगळे यांची ३० हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी (एमएच १५, ईयू १०५३) चोरट्यांनी १५ व १६ सप्टेंबर रोजी पेठ नाक्यावरील यशवंत हॉस्पिटलजवळून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आगर टाकळी येथील समतानगरमधील रहिवासी शशांक वाघमारे यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, डीव्ही ३१००) सोमवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास गोल्फ क्लब मैदानाच्या गेटसमोरून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़