दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:36 IST2019-04-23T00:36:07+5:302019-04-23T00:36:25+5:30
भिवंडीहून दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडून मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

दोन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघांना अटक
नाशिकरोड : भिवंडीहून दोघा अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेणाऱ्या दोघा संशयितांना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पोलिसांनी पकडून मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.
भिवंडी येथील दोन अल्पवयीन मुली मंगळवारी (दि.१६) कुठेतरी निघून गेल्याचे त्यांच्या पालकांच्या लक्षात आले. दोन्ही मुलींचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर झुनिआ बिंद व त्याचा अल्पवयीन मित्र यांच्याविरुद्ध भिवंडी पोलीस ठाण्यात दोघा अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अपहरणाचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलीस याप्रकरणी संशयितांचा शोध घेत असताना दोघा अल्पवयीन मुलींना घेऊन रेल्वेने बिहारला जाणार असल्याची माहिती मिळाली. संशयितांजवळील असलेल्या मोबाइलचे लोकेशन नाशिकरोड रेल्वेस्थानकाजवळ मिळत होते. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी तत्काळ नाशिकरोड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून दोन अल्पवयीन मुली व दोघा संशयितांची माहिती, फोटो मोबाइलवर पाठविले. नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक उपनिरीक्षक रवींद्र पाटील, जावेद शेख व इतर कर्मचारी रेल्वेस्थानक व बाहेरील परिसरात शोध घेत असताना दोन्ही अल्पवयीन मुली दोघा संशयित मुलांसोबत नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बिहारला जाणाºया रेल्वेची वाट पाहत असताना आढळून आले. रेल्वे पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुली व दोघा मुलांना ताब्यात घेऊन भिवंडी पोलिसांना माहिती दिली. भिवंडी पोलिसांनी लागलीच नाशिकरोड गाठून दोघा संशयितांना ताब्यात घेत अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.