विल्होळी शिवारात दोन कंपन्यांना आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 18:31 IST2019-04-05T18:30:38+5:302019-04-05T18:31:54+5:30
होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली

विल्होळी शिवारात दोन कंपन्यांना आग; लाखोंचे नुकसान
नाशिक : विल्होळी गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांपैकी कोणीतरी अज्ञात इसमाने धुम्रपान करताना जळती आगकाडी अथवा बिडी, सिगारेटचे थोटके खाली फेकून दिल्यामुळे वाळलेले गवत पेटत-पेटत दोन्ही कंपन्यांच्या आवारापर्यंत पोहचले. यावेळी कंपन्यांच्या आवारात असलेल्या टायरसारख्या टाकाऊ साहित्याने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. यावेळी तत्काळ परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळविण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा तासानंतर सिडको उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. तत्पुर्वी स्थानिक नागरिकांनी टॅँकरच्या मदतीने आगीवर पाणी फेकत नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. सिडको बंबाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न क रूनही आग आटोक्यात येत नव्हती, तसेच बंबामधील पाण्याचा साठाही संपत आल्यामुळे तत्काळ सातपूर उपकेंद्राची मदत मागितली गेली. काही वेळेत सातपूरचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविली.
अंबड औद्योगिक वसाहत घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असून महापालिका व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्ररित्या नवीन अग्नीशमन उपकेंद्र स्थापन करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.