वाहतूक पोलिसांकडून मारहाण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:57 IST2019-04-16T00:57:23+5:302019-04-16T00:57:41+5:30
वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला.

वाहतूक पोलिसांकडून मारहाण?
सिडको : वाडीवºहे येथून दुचाकीवरून दोघे मित्र पाथर्डी फाट्यावर विनाहेल्मेट आले असता त्यांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अडविले, मात्र दंडाच्या रकमेइतके पैसे नसल्यामुळे त्यांनी दंड भरण्यास नकार दिला.
कमी पैसे घेऊन गाडी सोडण्यास सांगितले असता एकाने मोबाइलमधून चित्रीकरण करण्यास सुरुवात केल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसांनी युवकाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी कुठलीही घटना घडली नसून अंबड पोलीस ठाण्यात संबंधित युवकांवर केवळ कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी फाटा येथून दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करणाºया दोघा मित्रांना अडवून त्यापैकी एका युवकाला वाहतूक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची चर्चा शहरभर पसरली. हेल्मेट घातले नसल्याच्या कारणावरून पोलीस व युवक यांच्यात झालेल्या वादातून वाहतूक पोलिसांनी युवकास खाली पाडून बेदम मारहाण केल्याचे बोलले जाते. याबाबत सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्याकडून घडल्या प्रकाराबाबत माहिती घेतली असता त्यांनी अधिकृतपणे खुलासा केला. मारहाण झाल्याची चर्चा बिनबुडाची असून, निरर्थक आहे. वाहतूक पोलीस कोणालाही मारहाण करत नाही, केवळ दंडात्मक कारवाई करतात. त्या युवकांनी दंड भरण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी रीतसर अंबड पोलीस ठाण्यात वाहतूक नियमांचा उल्लंघन करत विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
युवकांनी पोलिसांचे मोबाइलने चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्याचा राग मनात धरून त्यांनी वाहतूक पोलिसांविषयी चुकीची माहिती देत विनाकारण समाजात प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती घेतली जात असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीरपणे कठोर कारवाई केली जाणार असल्याचे नखाते यांनी सांगितले.