मातीचे बैल बनविण्याची परंपरा अद्यापही टिकून
By Admin | Updated: July 17, 2017 00:15 IST2017-07-17T00:03:17+5:302017-07-17T00:15:34+5:30
नाशिक : वर्षभर शेतात मेहनत करून, धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची मदत करणाऱ्या सर्जा राजाची सन्मानाने पूजा करून, त्याला गोडधोड खाऊ घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा

मातीचे बैल बनविण्याची परंपरा अद्यापही टिकून
भाग्यश्री मुळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वर्षभर शेतात मेहनत करून, घाम गाळून धान्य पिकवणाऱ्या बळीराजाला लाख मोलाची मदत करणाऱ्या सर्जा राजाची सन्मानाने पूजा करून, त्याला गोडधोड खाऊ घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सणाची तयारी बाजारात वेगाने सुरू आहे. जिवंत बैलांबरोबरच घरोघरी मातीच्या बैलांचीही पूजा केली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. त्यामुळे जुन्या नाशकातील कुंभारवाड्यात हे मातीचे बैल तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. घरटी ८ ते ९ हजार बैल तयार झाले असून, रंगरंगोटीचे काम बाकी आहे. आजच्या आधुनिक युगातही कुंभारवाड्याने मातीचे बैल तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे. कुंभारवाड्यात मातीच्या बैलांनी सुबक आकार घ्यायला सुरुवात केली आहे. कुंभारवाड्यात घरोघरी हजारोंच्या संख्येने मातीचे बैल तयार होत असून, महागाईचा फटका बसत असला तरी बैल तयार करण्याची कला जोपासली जात आहे. नाजूक कौशल्याचे, दीर्घकाळ बैठकीचे आणि मेहनतीचे असणारे हे काम दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या न परवडणारे होत चालले आहे. बैलनिर्मितीचे कौशल्य नविन पिढीही आवडीने शिकत आहे.
साहित्याला महागाईचा फटका
बैल बनवण्यासाठी चिकण माती, शेण, राख, पाणी असे साहित्य लागते. मातीच्या एका टेम्पोला ५०० रुपये खर्च येतो. शेण २० रुपये प्रतिपाटी या दराने खरेदी करावे लागते. रंगांच्या किमतीही दरवर्षी वाढत आहेत. या साहित्यावर कर नसला तरी त्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. कुंभारवाड्यातून व्यापारी २ ते ३ रुपये प्रतिबैल या दराने होलसेल भावात खरेदी केले जातात. छोटे विक्रेते उपनगरांमध्ये ते दुकान, हातगाड्यांवरून २५ ते ३० रुपये जोडी या दराने विकतात.