सुकेणेला नकटकवडीची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 00:40 IST2019-03-22T00:39:30+5:302019-03-22T00:40:00+5:30
कसबे सुकेणे येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली.

मौजे सुकेणे येथे धूलिवंदनानिमित्त काढण्यात आलेले नकटकवडीचे सोंग.
कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली.
मौजे सुकेणे गावाचा ग्रामोत्सव असलेला या सोहळ्याचा मान हांडोरे कुळाकडे असतो. संपूर्ण गावभर हातात केरसुणी, सूप घेऊन हा मान मिरविण्यात आला. यंदाही नकटकवडीने तीन तास गावात धूम उडविली. मुसळ्या आणि दोरखंड्याची मात्र मोठी दमछाक झाली. गावातील आबालवृद्धांनी खोबऱ्याची वाटी व वीर देव घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला. प्रथेप्रमाणे आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत गोड नैवेद्य व तळी आरती करून बोंबाही मारल्या.
हांडोरे वाड्यातील नृसिंह महाराज मंदिरातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. वसंत हांडोरे व सौ. गायत्री हांडोरे यांनी पूजा केली. यंदा दत्तात्रय हांडोरे यांनी नकटकवडी, बाळासाहेब हांडोरे यांनी मुसळ्या तर संकेत हांडोरे व सुनील हांडोरे, सार्थक हांडोरे, मनोज हांडोरे यांनी दोरखंड्याचा मान गावभर मिरविला. भास्कर धुमसे यांनी मानाचा डफ वाजवून नकटकवडीबरोबर गाव होळीला पाच प्रदक्षिणा घातल्या. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.