रेवर खुनातील संशयिताच्या कुटुंबीयांना तिघांकडून धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 18:11 IST2018-11-24T18:11:19+5:302018-11-24T18:11:50+5:30
नाशिक : सराईत गुन्हेगार मनीष रेवर याच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन लेवे याच्या पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कर्णनगर ...

रेवर खुनातील संशयिताच्या कुटुंबीयांना तिघांकडून धमकी
नाशिक : सराईत गुन्हेगार मनीष रेवर याच्या खुनातील प्रमुख संशयित चेतन लेवे याच्या पेठ रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील कर्णनगर परिसरातील घरासमोर तिघा संशयितांनी धुडगूस घालून लेवे कुटुंबीयांना धमकी देऊन दुचाकीची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) सकाळच्या सुमारास घडली.
पंचवटी पोलीस ठाण्यात सचिन लेवे (रा. महालक्ष्मी रो-हाऊस नंबर ३, कर्णनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास संशयित विजय बाळासाहेब तारगे (२३, रा. प्लॅट नंबर २३, भावबंधन मंगल कार्यालयासमोर, बुरकुलेनगर, हनुमानवाडी), हेमंत अशोक पवार (२३, वेडेबाबा मठासमोर, नवनिर्माण चौक, मखमलाबाद नाका, पंचवटी) व लखन वसंत लुले (२३, रा. उत्तर दरवाजा, शांताबाई आखाडा, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी) हे घरासमोर आले़ तसेच ‘कुठे आहेत तो चेत्या? त्याला आता आम्ही संपवून टाकतो. त्याने आमच्या मनीष रेवर या मित्राचा खून केला आहे. त्यामुळे आम्ही चेत्याला जिवंत सोडणार नाही’ असे मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ केली. तसेच हातात तलवार घेऊन येत दहशत निर्माण करून या तलवारीने येथे उभी असलेली डिओ दुचाकीच्या (एमएच १५ ईओ ०९४३) हेडलाइटच्या काचा फोडून सीटकव्हर फाडले, तर चेत्या लेवे आम्हाला सापडला नाही, तर तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित तारबे, पवार व लुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़