सावरगावच्या दसरा मेळाव्यासाठी नाशकातून जाणार हजारो भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 20:49 IST2019-10-01T20:44:47+5:302019-10-01T20:49:05+5:30
भगवान बाबांच्या गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी मतभेद निर्माण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी गेल्या तीन वर्षांपासून होणारा दसरा मेळावा यंदाही होणश्र असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पन्नास हजार भाविक जाणार असल्याची माहिती मेळावा समन्वयक डॉ. भागवत कराड यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि.१) दिली.

सावरगावच्या दसरा मेळाव्यासाठी नाशकातून जाणार हजारो भाविक
नाशिक : भगवान बाबांच्या गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याविषयी मतभेद निर्माण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील संत भगवान बाबा यांच्या जन्मगावी गेल्या तीन वर्षांपासून होणारा दसरा मेळावा यंदाही होणश्र असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यातून पन्नास हजार भाविक जाणार असल्याची माहिती मेळावा समन्वयक डॉ. भागवत कराड यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत मंगळवारी (दि.१) दिली.
भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध झाल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सावरगाव या संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी दसरा मेळावा सुरू केला असून, यावर्षी पुढील दि. ८ आॅक्टोबरला हा दसरा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा दसरा मेळावा कृती समितीच्या डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुकानिहाय दसरा मेळाव्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी तालुकानिहाय समन्वयकांची नेमणूकही केल्याचे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी सांगितले. यावेळी पंढरीनाथ काकड, रमेश नागरे, गोविंदराव साबळे, बंडूनाना भाबड, बाळासाहेब गामणे, शरद बोडके, माणिकराव सोनवणे, प्रकाश घुगे, विक्रम नागरे, संजय सानप, नारायण काकड, श्याम बोडके, राहुल आव्हाड आदी उपस्थित होते.
पताकांचा विश्वविक्रम
सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर येणाऱ्या भाविकांचा २५ जणांचा गट सोबत एक पताका घेऊन येणार आहे. या मेळाव्यास ८ लाख भाविक येण्याचे नियोजन असून, जवळपास दोन लाख पताका यावेळी भगवान बाबांच्या समाधीसमोर रोवण्यात येणार आहेत. या मेळाव्यात पताका रोवण्याचा विश्वविक्रम केला जाणार असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.